स्वरवंदना - पुढची पिढी

कोविड काळात रूढ झालेल्या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे एक फार चांगली गोष्ट झाली आहे. भारतीय संगीत शिक्षण ऑनलाईन उपलब्ध झाले आहे आणि त्याला समाजमान्यताही मिळत आहे. फार लहान वयात परदेशी स्थायिक झालेल्या मुलांचे काही वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न असतात. भारतात जितक्या सहज भारतीय गाणी, संगीत कानावर पडतात तितकी इथे पडत नाहीत. काही कानावर पडलेच तर ते अलीकडचे बॉलीवूड अ-संगीत असते किंवा K-pop हा प्रकार असतो. इंटरनॅशनल शाळांमध्ये कौतुक वाटावे इतके पद्धतशीरपणे संगीत शिक्षण सर्व मुलांना दिले जाते पण ते पाश्चात्य पद्धतीचे असते, त्यामुळे या मुलांची संगीताशी ओळख झालेली असली तरीही त्यांची संगीताची भाषाच फार वेगळी असते. ती भाषा आम्हा भारतीय संगीताच्या वातावरणात वाढलेल्या आई-वडिलांना समजत नाही आणि आमची भाषा त्यांना समजत नाही. या दोन्ही भाषा येणारे आई-वडील जवळ जवळ नाहीतच. काळी चार आणि काळी पाचला फक्त G# आणि A# म्हणून ओळखणाऱ्या या मुलांना देवनागरीही तुटपुंजीच येत असते. मराठी घरांत हिंदी आणि ब्रज भाषा हा विषय तर दूरच राहिला. तरीही ही मुले आयपॅडवरती तानपुरे आणि तबले वाजवून अलंकार, पारंपारिक बंदिशी आणि आलाप-ताना शिकतात तेव्हा त्यांचे अतिशय कौतुक वाटते. बऱ्याच वेळा ही मुले केवळ पालक सांगतात (ओरडतात) म्हणून तेवढे करत असतात पण त्यातल्या काही जणांमध्ये तरी हळू हळू ती आवड निर्माण निश्चित होते. आजूबाजूच्या आपल्या मित्र मैत्रिणींना आपण हे काय करतोय ते अजिबात समजत नाही, आणि आपण हे करतो हे त्यांना समजले तर कदाचित ते आपल्याला हसतील ही शक्यता माहिती असून ती मुले हे करतात म्हणून त्यांना शंभर टक्के मार्क.

 

यंदा महाराष्ट्र मंडळ हाँगकाँगच्या गणेशोत्सवात होणाऱ्या "स्वरवंदना" या वार्षिक गाण्याच्या कार्यक्रमात फक्त ६-१७ वयोगटातील पद्धतशीर गाणे शिकणारी लहान मुले गायली. मंडळात उपजत सुरेल असलेली मुले खूप आहेत. परंतु पारंपरिक संगीत शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे म्हणून पद्धतशीर संगीत शिकणाऱ्या मुलांनाच गायला संधी दिली गेली. सौ मुग्धा रत्नपारखी यांच्या घरी तालमी झाल्या. श्री जयराम परमेश्वरन यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मुलांनी मेहनत घेतली, पालकांनी सुयोग्य सहाय्य केले आणि २३ सप्टेंबर २०२३ रोजी हॅपी वॅलीच्या हिंदू मंदिरात दणक्यात कार्यक्रम झाला. 

 

हे असे काही मुलांनी केले की अत्यंत स्वाभाविकपणे त्यांचा गाताना समोरून व्हिडिओ काढला जातो. भारतात असलेल्या आपल्या आप्तेष्टांनी, मुलांच्या आजी-आजोबांनी तो व्हिडिओ बघावा म्हणून धडाधड तो व्हिडिओ WhatsApp वर पाठवला ही जातो. पण या व्हिडिओमध्ये ही मुले कशा वातावरणात आहेत, त्यांच्या आजूबाजूला कोण आहे, कोण साथसंगत करत आहे, प्रेक्षक वर्ग कसा आणि किती आहे, ज्या मंदिरात ही मुलं गातात ते मंदिर कसे आहे, असे बरेच पैलू दिसतच नाहीत. मला असं वाटतं की आम्ही परदेशी असणारे परदेशात भारतीय वातावरण कसे निर्माण करतो ते भारतातल्या लोकांपर्यंत जरूर पोहोचायला हवे. हेच ध्येय समोर ठेवून यावर्षी मी स्वेच्छेने या मुलांकरता त्यांच्या कार्यक्रमाचा परिपूर्ण व्हिडिओ करण्याचे काम अंगावर घेतले.

 

कुठलेही काम चांगले करण्याकरता त्याच्यासाठी अतिशय योग्य साधने वापरायला हवी हा नियम मी माझ्या बाबांच्या वागण्यातून शिकले. साधी भाजीची यादी करायची असली तरी हातात चांगले चालणारे पेन किंवा पेन्सिल असेल तरच ती यादी चांगली होते असा माझा ठाम समज आहे. चांगल्या साधनांमुळे काम efficiently आणि उत्तम दर्जाचे होते पण चांगल्या साधनाचा आग्रह हा दुराग्रह झाला तर कामेच होत नाहीत. कधी कधी हाताशी जे असते त्यातून जमेल तितके उत्तम काम देण्याचा प्रयत्न ही करावाच लागतो. 

 

मी आतापर्यंत Scripted व्हिडिओज अनेक केलेले असले तरी लाईव्ह कॉन्सर्टचे व्हिडिओ शूटिंग आणि त्यानंतर येणारे त्याचे एडिटिंग हे विषय माझ्यासाठी संपूर्णपणे नवीन होते. मला मार्गदर्शन करायला कोणीही नाही. या कामाविषयी इंटरनेटवर माहिती शोधली तर त्यात सुचवलेली संसाधने आपल्याकडे नाहीतच हे लक्षात आले. 

 

- मंदिरातील lighting हे काही concert shooting साठी डिझाईन केले गेलेले नाही. जो उजेड आहे त्यात जमेल तितका चांगला व्हिडिओ काढायचा इतकेच.

- आमच्या हाताशी प्रोफेशनल कॅमेरा नाहीत. छान छान फोन मात्र मंडळींकडे आहेत. 

- व्हिडिओ शूटिंग या विषयातील प्रशिक्षण किंवा अनुभव असणारे कॅमेरामेन नाहीत, पण उत्साही स्वयंसेवक मंडळात भरपूर आहेत. 

- साऊंड मिक्सर मधून ऑडिओ उपलब्ध होणे शक्य नाही आणि त्यावर काम करायला साऊंड इंजिनियरही नाहीच. परंतु हक्काने स्पीकरला चिकटून उभे राहून रेकॉर्ड करण्याची सोय मात्र आहे. 

- उत्कृष्ट एडिटिंग करायला महागडे सॉफ्टवेअरही नाही. पण एक बेसिक स्वस्त आणि काम देणारे सॉफ्टवेअर आहे. 

- स्टुडिओ मधल्या मोठ्या स्क्रीन सारखा स्क्रीन नाही, sound proof room नाही, परंतु एक घरगुती छान कामाला येणारा लॅपटॉप, आणि कामाकरता टेबल आहे.

- कुठल्याही प्रकारचे controlled environment नाही. मंदिर म्हटल्यावर माणसे येत जात राहणार. ठरलेले कॅमेरे सोडून इतर अनेक कॅमेरे लुडबुड करत राहणार. गर्दी वाढेल तसे acoustics बदलत राहणार. अतिशय कौटुंबिक वातावरण असल्याने एखादे बाळ मध्येच रांगत येणार हे नक्की. प्रेक्षकांतला कोणीतरी मध्येच गायला लागणार, स्टेज वरील कोणी मूल कंटाळून मध्येच निघून जाणार हे सगळे आलेच!

 

तरीही मंडळाच्या अध्यक्षा सौ मुग्धा रत्नपारखी यांनी मला मोकळा हात दिला, श्री जयराम परमेश्वरन यांनी त्यांच्या पेटी वर सतत कॅमेरा रोखण्याची परवानगी दिली, मुलांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यांचे व्हिडिओ विश्वासाने माझ्या हाती सोपवले, आणि मी न जाणो कोणत्या आत्मविश्वासाने या कामाला लागले. आजूबाजूला सहा कॅमेरे असताना मुलांना कसे बसायचे, कसे वागायचे याचे धडे दिले. कार्यक्रमाच्या दिवशी कुणाकडून ट्रायपॉड, कुणाकडून लाईट असे उसने घेत आम्ही सहा मंडळींनी मिळून, वेगवेगळ्या अँगल मधून कार्यक्रम टिपला आणि त्यानंतर महिनाभर मुलांच्या बारा गाण्यांचे व्हिडिओ एडिटिंगचे काम मी केले.

 

प्रत्येक व्हिडिओ मागे चार ते सहा तास इतके एडिटिंग करायला लागले. एका गाण्यामागे तास सव्वा तासाचे footage होते. ७-१० GB इतका data होता. फायनल व्हिडिओ होता फक्त पाच ते आठ मिनिटांचा आणि साधारण १ GB चा. परंतु distraction च्या जमान्यात आजचे प्रेक्षक अर्धा किंवा एक मिनिट यावर एकही क्षण त्या व्हिडिओवर घालवत नाहीत. त्यात काही फार चूकही नाही म्हणा, ज्या युट्युब वर आमची मुलं गातात, तिथेच दिग्गजही तीच गाणी गात असतात. आमच्या लहान मुलांची बालिश गाणी कोणी का बरे बघावीत? हे माहीत असूनही हे काम करण्यात एक समाधान होते. एक तर केलेल्या कार्यक्रमाची, मेहनतीची कुठेतरी नोंद करायची हा हेतू होता. जी मुले गात होती त्यांना आपल्या बालपणीची एक परिपूर्ण गोड आठवण राहावी, मंडळ-प्रेक्षक-मंदिर हे आठवणीत राहावे असेही  वाटत होते. हा व्हिडिओ, त्यातले प्रेक्षक, ते वातावरण बघून त्या त्या मुलाला कदाचित आयुष्यात पुढे हे गांभीर्याने करण्याची प्रेरणा मिळू शकेल ही शक्यता होती. या देशात पाश्चात्य गायनाचे होते तसेच या गायनप्रकाराचे ही भरपूर कौतुक होते हे मुलांच्या लक्षात आणून देणे आवश्यक होते. आणि कौतुकाने बघणाऱ्या आजी-आजोबांना आपली नात किंवा आपला नातू किती आत्मविश्वासाने, किती लोकांच्या समोर, काय वातावरणात, आपल्या पद्धतीचे गाणे गायली किंवा गायला हे बघायला मिळावे म्हणून तर हा उपक्रम केला. मुलांचे कार्यक्रमानंतरही हे व्हीडिओ बघून कौतुक झाले असेलच आणि होतही राहील. काही वर्षांनी हीच मुले हेच विडिओ बघून आपण किती प्रगती केली हे मापु शकतील. 

 

मला यातून समाधान तर मिळालेच पण कार्यानुभवही मिळाला. कुठलेही काम पहिल्यांदाच करताना आपल्याला सांभाळून घेणारी, आपल्या चुका पोटात घालणारी माणसे लागतात. मंडळाला स्वयंसेवक फक्त वेळ आणि कार्य देतच असतात असे नाही तर त्यातून माणसे, अनुभव, शहाणपण मिळवतही असतात. चुका करत, ठेचकाळत एकत्र शिकत राहण्याकरता आणि प्रगती करण्याकरता मंडळ हे व्यासपीठ आपल्या सर्वांना उपलब्ध करून देते. मात्र त्या बदल्यात आपल्याला वेळ, उत्साह, आणि काम तडीला नेण्याची प्रबळ इच्छा दाखवावी लागते. आपण सर्वांनीही आपल्याकडे असलेले कौशल्य वापरून मंडळाबरोबर काम करून बघा. नक्कीच संपन्न व्हाल!

 

केतकी बक्षी