सुस्वागतम्


 

"हाँगकाँग हे चिमुकले डोंगराळ बेट आहे. डोंगराळ बेट कसले ? समुद्रात सोंगटीसारखा पडलेला हा एक डोंगरच आहे. इंग्रजांनी अक्षरशः पहाड फोडून हे नगर वसवले. त्यांनी तो डोंगर कापला. त्यातून सुंदर रस्ते काढले. उतरणीवर दहा दहा मजली इमारती उठवल्या. शहर असे देखणे केले की पाहत राहावे."

 

"माझा हॉंगकॉंगला जाण्याचा मुख्य उद्देश्य चीनी भोजनाचे सर्व प्रकार चाखणे हा होता."

 

"इथे व्यापारी आणि जुगारी संस्कृती आहे आणि तिच्याशी आमच्या मराठी मंडळींचं जमणे अशक्य.""हाँगकाँग मधील ते मराठीमंडळ मला त्यांच्या मराठीपणामुळे फार आवडले."

 

- पु. ल. देशपांडे( पूर्वरंग ) 

 

१९६२-६३ च्या या प्रवासवर्णनात पु. ल. जागोजागी मराठीमंडळाच्या अगत्यशीलतेचे कौतुक करतात. अशी ही ५० हून अधिक वर्षांची हाँगकाँग महाराष्ट्र मंडळाची परंपरा. आम्ही ती तशीच पुढे चालू ठेवत आहोत. असे हे आमचे हाँगकाँग महाराष्ट्र मंडळ म्हणजे एक मोठे कुटुंब ! आम्ही वर्षभर वेगवेगळे सण  साजरे करतो;  सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यकम करतो. 'वाचनमात्रे', 'बोलतो मराठी', सारखे उपक्रम राबवतो. तुम्हाला त्या सगळ्याची या वेबसाईटद्वारे ओळख करून देत आहोत. 

 

तुम्ही हाँगकाँगला भेट देणार असाल, तर आम्हाला जरूर कळवा आणि हॉंगकॉंगमध्ये वास्तव्याला येणार असाल तर आमच्या या कुटुंबात सामील व्हा...! 

चला तर डोकावूया या  डोंगराळ बेटात - सुगंधी बंदरात !                                                                      

 

-मनोज कुळकर्णी, अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ हॉंग कॉंग

२०१४-२०२०                                                                                                       

                                                                                                                 
Upcoming EventsPast Eventsगणेशोत्सव २०२१

परवा दिवशी महाराष्ट्र मंडळ हाँग काँगचा गणेशोत्सव यशस्वीरीत्या पूर्ण झाला - यशस्वीरीत्या अशा करता म्हटलं, कारण सर्व सदस्यांनी पुरेपूर आनंद अनुभवला. गेल्या १.५ वर्षातील घडामोडींचा काही तास विसर पडला, भेटी-गाठी झाल्या, छान भारतीय पोशाख बाहेर आले, लहान मुलांना "आपली" माणसं म्हणजे कोण, "आपली माणसं" म्हणजे काय आणि "आपली संस्कृती" कशी वेगळी याचा अनुभव आला. गेल्या वर्षीपासून घरात आपण बोलतो ती भाषा घराबाहेर इतक्या मोठ्या प्रमाणावर ऐकू येणे हा मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही दुर्मिळ अनुभव झाला होता. 

 

मंडळाचा "स्वरवंदना" हा वार्षिक संगीत सोहळाही उत्तम झाला, त्याविषयी कौतुकाचे शब्द अजूनही मंडळाकडे येणं थांबत नाहीये. प्रसन्न वातावरणात मंडळाच्या हौशी कलाकारांनी, आपल्या स्वतःच्या पात्रतेला सुयोग्य न्याय देत, २.५ - ३ महिने तालमी करून मनापासून आपली कला सादर केली. खूप कौतुक झालं. 

 

मी यावर्षी प्रथमच निवेदिकेची भूमिका केली आणि काही नवीन गोष्टी लक्षात आल्या. स्टेजवरच्या प्रत्येकाला भूमिकेनुसार प्रेक्षक हा वेगळा भासतो, त्याच्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात. गायक-गायिका प्रेक्षकांकडून समेवर टाळी, नेमक्या लागलेल्या सुराला दाद, आणि चुकांना दिलदारपणे केलेली क्षमा शोधत असतात. वादक हे गायकाइतकेच कसलेले कलाकार असले तरी नेहमीच आपली गायकापुढे असलेली दुय्यम भूमिका नम्रपणे स्वीकारून, प्रेक्षकांकडून वादन-गायन या सहयोगासाठी दाद शोधत असतात, मात्र मनाच्या एका कोपऱ्यात कोणीतरी फक्त आपलं वादन ही कान देऊन ऐकावं अशी आशा करत असतात. निवेदकाला मात्र कार्यक्रम मार्गावर ठेवण्याचं कर्तव्य करत असताना काहीतरी वेगळंच दिसत असतं, समजत असतं. 

 

समोर बसलेल्या समुदायाचा सामूहिक मूड, कल, इच्छा अशा सर्व गोष्टी अचानक दिसायला लागतात आणि एकदम कळतं की ही सर्व माणसं कलाकारांविषयी अत्यंत चांगल्या भावना, सदिच्छा मनात ठेवून आहेत. बघा ना - कार्यक्रम चांगलाच असेल असा छान विचार मनात असल्याशिवाय एखादी व्यक्ती कार्यक्रमाला येणारच नाही! यावर्षी त्याचा पुरेपूर अनुभव घेतला. मंडळाचे प्रेक्षक होतेच खास - जवळ जवळ २ तास चाललेल्या कार्यक्रमात प्रत्येक क्षणी समरसून गेलेले प्रेक्षक मी पाहिले. सुरा-सुराला दाद, समेवर दिसलेली बोलकी देहबोली, निवेदनातल्या हलक्याफुलक्या क्षणांमध्ये चेहऱ्यांवर सहज उमटलेलं स्मितहास्य, उत्स्फूर्त असे अनेक वन्स मोअर, आणि कार्यक्रम झाल्यावर मुक्तहस्ते केलेली कौतुकाची उधळण - प्रेक्षक असावे तर असे! 

 

मंडळातील व्यासपीठावर संगीताचे कार्यक्रम हे सांगीतिक गुणवत्तेच्या मोजपट्टीवर किती खरे ठरतात या पेक्षा ते माणसांना किती जवळ आणतात हे महत्वाचं असतं असं मला वाटतं. समोर सादर केली जाणारी गाणी ही प्रेक्षकांना त्यांच्या समान असलेल्या रम्य भूतकाळात नेतात का, हा त्यातला एक महत्वाचा भाग ठरतो. प्रेक्षक हा समोर असलेला क्षण जगताना तितकाच जेव्हा आपल्या आठवणींमध्ये रमतो, तेव्हा कार्यक्रम चांगला होतो. त्याशिवाय आपल्या आजूबाजूला असणारे आपल्या आवडीचे आणि आपली भाषा बोलणारे परिचित, हवेत ओळखीचा पवित्र सुगंध, गुंतवून ठेवणारी; कानाला आनंद देणारी ध्वनी योजना, आणि डोळ्याला दिसणारे भारतीय रंगातले कपडे - हे आणि इतर अनेक डायमेन्शन असलेला परिपूर्ण अनुभव हा कार्यक्रम देतो. कार्यक्रमात घेतलेले फोटो आणि विडिओ हे कितीही आवडले तरी त्या फक्त तुटपुंज्या आठवणी असतात, आणि ते आवडले नाहीत तरीही ती फक्त क्षणचित्र आहेत, परिपूर्ण अनुभव नाही हे लक्षात घ्यावं लागतं.

 

एकंदर काय, सगळंच छान झालं यावर्षी आणि पुढच्या वर्षीचे लागलेले वेध हवेत दिसत आहेत! 

 

मंडळाचे आभार, कलाकारांचे आभार, फोटोग्राफर्सचे आभार, आणि प्रेक्षकांना जोरदार सलाम!

 

©️सौ. केतकी बक्षी