युगे अठ्ठावीस ! (भाग २)


मंडळामध्ये एक अत्यंत हरहुन्नरी असे कुटुंब भेटले. शेखर कुमटा आणि नूतन तांबे, दोघेही डॉक्टर आणि त्यांची तीन अतिहुशार मुले. हे कुटुंब घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी जबरदस्त होते. हेही डोंगरांत भटकत असत पण हे वाटांवरून कधीच फिरत नसत. झाडीतून, दगडाधोंड्यांतून स्वतःच्या वाटा शोधत हिंडत असत. काही वर्षांनी त्यांनी होई हा नावाच्या बीचवर एक घर भाड्याने घेतले व ९ बोटी (कयाक), ९ लाईफ जॅकेट्स घेतली. त्याच्या आणि आमच्या सर्व कुटुंबाला शेखरने कायाकिंग शिकवले. शेखरला चांगले सिनिमे पाहण्याचे वेड होते. त्याच्यामुळे कितीतरी चांगले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सिनेमे आम्हाला बघायला मिळाले. त्यांच्याकडे खूप चांगली चांगली पुस्तके असत, तीही वाचायची संधी मिळाली. त्यांच्या बीचवरच्या घरी एक खूप क्षमतेची दुर्बीण होती. त्यातून तो शनीभोवतीची वर्तुळे, गुरुचे चंद्र, आकाशात दिसणाऱ्या काही विशिष्ट घडामोडी दाखवत असे. माझी मुले त्याच्यामुळे स्कुबा डायविंग शिकली. त्या कुटुंबामुळे आमच्या आयुष्याचा एकंदर दर्जा प्रचंड सुधारला. माझ्या मुलाने हाँग काँग सोडेपर्यंत शेखर त्याचा कयाकिंग पार्टनर होता, आणि जन्मभराचा मार्गदर्शक!

 

समुद्र आणि टेकड्या या दोन्ही अगदी जवळ आणि सहज जाण्यासारख्या असणे ही हाँग काँगची ही खासियत आहे. जगातल्या फार कमी जागांना हे भाग्य लाभलेले आहे. बहुतेक स्थानिकही याचा पुरेपूर फायदा करून घेताना दिसतात. 

 

१९९७ जसे जवळ येत गेले तशी ब्रिटिश राज जाऊन चिनी राज येण्याची भीती प्रत्येक परदेशी माणसाला वाटू लागली होती. आपापल्या परीने प्रत्येकाने मानसिक तयारी आणि नियोजन करून ठेवले होते. ब्रिटिशांनी १५० वर्षात हाँग काँगच्या रहिवाशांना न दिलेल्या लोकशाहीची बीजे पेरायला सुरवात केली होती. चिनी आल्यावर काय बदल होणार यांवर सगळीकडे चर्चा सुरु झाल्या होत्या. घरोघरी हा विषय चघळला जात होता. काहींनी मुलांना भारतात शाळेत पाठवले तर कितीतरी सिंधी कुटुंबांनी पुणे मुंबईत फ्लॅट्स घेऊन ठेवले. एकंदरीत ते वर्ष जसे जवळ येऊ लागले तशी चिंता वाढू लागली. आम्हीही भारतात जाऊन विजयची ग्वाल्हेरची सिंदिया स्कूल, उटीची लव्हडेल आणि पाचगणीच्या काही शाळा बघून आलो. पण खरे तर सगळ्या कुटुंबाला एकत्र राहता यावे म्हणून विजयने बोट सोडली होती. मग सारासार विचार केला आणि इथेच राहायचे ठरवले. 

 

१९९७ चा हस्तांतरण कार्यक्रम नेत्रदीपक झाला. ब्रिटिश शाळांच्या मुलांना त्या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी ब्रिटिशांनी हाँग काँगला जाताजाता प्रचंड क्षमतेचा एअरपोर्ट आणि लोकशाहीची बीजे दिली. इतके वर्ष केलेली चिंता तात्पुरती तरी फोल ठरली. काही रस्त्यांच्या नावात बदल, कचरापेट्यांवरचे राणीचे चेहरे आणि RSPCA सारख्या संस्थांच्या नावांमधून रॉयलचा R नाहीसा होणे यापलीकडे सामान्य माणसाच्या आयुष्यात काही फरक पडला नाही. म्हणून आमच्याही आयुष्यात झाला नाही. मात्र हाँगकाँगच्या स्थानिक  जनतेची शेंडी त्यांच्या कल्याणाशी

काहीही घेणे देणे नसणाऱ्या एका परक्या राजवटीकडून दुसऱ्या परक्या राजवटी कडे सोपवली गेली. 

 

२००३ चे वर्ष श्वसनाचा विषाणू SAARS आणि बेसिक लॉ मधील २३व्या कलामावरून झालेलय निषेधाने गाजले. त्यावर्षी माझा लेक GCSE ची परीक्षा देत होता. ही परीक्षा मे मध्ये असे. मार्चमध्ये हाँग काँग मध्ये चीनहून आलेला एक डॉक्टर मेट्रोपोल हॉटेलमध्ये आजारी पडला. त्या लिफ्टमध्ये असलेले काहीजण आणि प्रिन्स ऑफ वेल्स हॉस्पिटल, जेथे त्याच्यावर उपाय चालू होते तेथील कितीतरी आरोग्य कर्मचारी आजारी झाले. काही दिवसांत कावलून बे मधील अमॉय गार्डेनमध्ये पूर्ण इमारतीला विषाणूची बाधा झाली. बऱ्याच देशांनी हाँग काँगच्या प्रवासाला धोकादायक घोषित केले. शाळा बंद झाल्या. त्यावेळी ऑनलाईन वर्ग भरण्याची सोय नसल्याने ईमेल वरून धडे आणि गृहपाठ येत असे. परीक्षा होईपर्यंत शाळा सुरूच झाल्या नाहीत. 

 

जुलैमध्ये सरकारने मूळ अधिकारांमध्ये (बेसिक लॉ) कलम २३ लागू करण्याबद्दल घोषणा केली आणि वातावरण चांगलेच तापले. पाच लाख स्थानिकांनी रस्त्यावर येऊन ता कलमाविरुद्ध आंदोलन केले.  १९९७ साली हाँग काँगची  एक देश दोन व्यवस्था ही चिनी सरकारने मान्य केलेली जी घटना अंमलात आणली गेली त्यातील हे कलम. यात विशिष्ट परिस्थितीत हे देशद्रोहाच्या बाबीतील कलम लागू करण्याचा अधिकार हाँगकॉंग च्या स्थानिक सरकारला दिलेला आहे. हाँगकाँगच्या त्या वेळच्या मुख्य अधिकाऱ्याने तो लागू करण्याचा प्रयत्न केला. 

 

आमच्या घरी लेकाचा मित्र नील येत असे आणि त्यांच्यात या विषयावर सतत चर्चा होत असे. १ जुलैला जेव्हा लोक रस्त्यावर आले तेव्हा लेकाने घोषणा केली की हा निषेध पूर्णपणे शांततेत पार पडणार आहे आणि आम्ही दोघे यात भाग घेणार आहोत. त्याला जर हिंसक वळण लागले तर आम्ही तातडीने ते सोडून घरी येऊ. १ जुलैला भर उन्हाळा असल्यामुळे त्या दोघांनी एका संस्थेकडून पाण्याच्या बाटली मिळवल्या आणि त्यांचे वाटपही केले. या घटनेमुळे त्याची दहावीनंतरची सुट्टी हाँगकाँगची  आणि इतर देशांची घटना वाचण्यात गेली. पुढे त्याने अभियांत्रिकीचा अभ्यास सोडून देऊन राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र शिकण्याचा निर्णय घेतला त्याची बीजे २००३ च्या या घटनेत होती असे मला वाटते. 

 

२००६ मध्ये आम्ही हाँग काँग आयलंडवरील पोक फु लाम नावाचा भाग सोडून शहराबाहेर साई कुंगला राहायला आलो. हाँगकाँग चे आयलंड, कावलून आणि न्यू टेरेटरीज असे तीन भाग आहेत. पहिले दोन अतिशय गजबजलेले आणि इमारतींचे जंगल आहेत. सत्तर सत्तर मजली उंच इमारती आहेत. तिसऱ्या भागामधील साई कुंगमध्ये उंच इमारती बांधायला बंदी आहे. दाट हिरवीगार झाडी आणि छोट्या टुमदार बंगल्यांनी हा परिसर सजला आहे. इतके वर्ष मुलांच्या शाळा आणि शाळेनंतरचे त्यांचे उद्योग यामुळे इच्छा असूनही या भागात राहणे जमले नव्हते. 

 

इथल्या बाकी सर्व छोट्या गावांप्रमाणे, आमच्या नाम वाय नावाच्या गावातही गावठाण आणि परदेशी लोकांची घरे एकमेकांपासून थोड्या अंतरावर असतात. आपल्याकडे जशी एकेक गावातून एकेक घराणी असतात तशी या गावात याव आणि तुंग अशी दोन घराणी आहेत. दोन्हींची घरे दोन पुंजक्यात आहेत. दोन्ही घराण्यांच्या वेगवेगळ्या ग्रामदेवता आहेत. हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर १०१ हिंदी सिनेमांसारखी, एका गावातील दोन घराणी तलवारी घेऊन मारामाऱ्या करताहेत असा सीन उभा राहिला. पण या दोन घराण्यात रोटी बेटी संबंधही होते. चिनी नवीन वर्षाला ड्रॅगॉनच्या तोंडाने कोबी तोडायची मिरवणूक असते ती दोन्ही घराण्यांची एकत्र असायची. 

 

आमच्या घरासमोर याव कुटुंबाची घरे सुरु होत असल्याने आम्हाला त्यांच्या बऱ्याच काही पद्धती बघायला मिळत असत. मी एकदा गच्चीत झाडांना पाणी घालत असताना आपल्या  झांजांसारखा आवाज येऊ लागला म्हणून पहिले. तुंग कुटुंबातील मुलीची वरात आमच्यासमोरच्या यावं कुटुंबात निघाली होती. आदल्या दिवशी रात्री सगळे वऱ्हाड  अंगणात माहजॉन्ग खेळात जागले होते. आता लाल चिनी कपड्यातल्या मुलीमागे हाताच्या तळव्यावर क्रोशेचा आवरणाने झाकलेल्या थाळ्या घेऊन नटलेल्या बहिणी वहिन्या चालत होत्या. काही बाप्ये झांजा ढोलासारखी वाद्ये वाजवत बरोबर चालत होती. आणि मग सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलगी घराच्या आत जाताना तिने जमिनीवर ठेवलेल्या चिपट्याला हळूच पाय लावला, त्याबरोबर त्यातले तांदूळ भसकन जमिनीवर सांडले. तिने माप ओलांडले होते. हाँग काँगला आल्यावरच्या पहिल्याच चिनी नवीन वर्षातल्या फराळातील करंजी मोदकासारखे आकार, त्यातील तीळ, शेंगदाणे याचे सारण, फटाके, आकाशकंदील हे सगळे बघून आम्ही आमची दिवाळी साजरी करून घेतली होती. पण ही वरात आणि माप ओलांडणे जरा जास्तच होते. 

 

त्या गावातील लोकांशी छान ओळखी झाल्या. गावाचा केस पांढरे झालेला मुखिया आणि त्याचे समवयस्क मित्रमंडळ गावाच्या वेशीवरच्या वडाच्या झाडाखाली खुर्च्या मांडून बसलेले असत. उन्हाळा वाढू लागला की त्यांच्या अंगावरचे कपडे कमी कमी होत बनियन  आणि अर्ध्या चड्डीवर येत. जुलैपर्यंत त्यांचे बनियान वर चढत चढत छातीपर्यंत जात. त्यांना कोण येते जाते, कोण कोणाशी बोलते याची बित्तंबातमी असे. मी अमेरिकेत अभ्यासाला गेले होते तेव्हा विजयला बायको कुठे आहे, कधी येणार हे सगळे प्रश्न विचारून झाले होते. आमच्या गच्चीवर मंडळाचे कार्यक्रम होत. 

 

मी अमेरिकेत असतानाच सचिन गिरसप्पा या मंडळाच्या उत्साही सभासदाचा फोन आला, मंडळाची अध्यक्ष होण्याबद्दल. मी अमेरिकेत येऊन जाऊन असणार हे माहित असल्यामुळे मी साहजिकच नकार दिला. पण दुसऱ्या कोणीच ती जबाबदारी घ्यायला तयार नसल्याने टी जबाबदारी माझ्यावर आली. मी त्यातली तीन वर्षे बाहेर होते. अमृता कुलकर्णी आणि सचिनने बरीचशी कामे अंगावर घेतली. सहा वर्षे माझ्याकडे हे अध्यक्षपद राहिले, अमृता आणि सचिनवर भिस्त ठेवून. आम्ही लहान मुलांच्या कार्यक्रमांवर जास्त भर दिला. 

 

क्रिमिनॉलॉजीमधील डिग्री घेतल्यावर मला बिगोनिया रोड बॉईज होम मध्ये काम करायची संधी मिळाली. इंग्लिश बोलणारी मुले या होम मध्ये असत. त्यातील काही पॅरोलवर असलेले काही विद्यार्थी शेजारच्या चर्चच्या शाळेत जात असत. त्या मुलांच्या कहाण्यांवरून लक्षात आले की बहुतेक जण ड्रग्ससंबंधित गुन्ह्यांसाठी होममध्ये आहेत. त्यांचा करविता धनी कोणीतरी वेगळाच असायचा. बहुतेकांना गेम्स खेळण्यासाठी पैसे हवे असायचे, ते कमवायचा मार्ग म्हणून पुड्या इकडून तिकडे नेण्याचा उद्योग करत आणि पकडले जात. काहींना त्यातून व्यसनही लागत असे. दुसरे कारण म्हणजे आधीच्या गर्लफ्रेंडच्या नव्या बॉयफ्रेंडशी मारामारी करणे. ही दोन करणे प्रामुख्याने या वयोगटात आढळत होती. तिथले काम चांगले चालले होते आणि तेवढ्यात ते होम चिनी हद्दीच्या जवळ हलवणार असे समजले. 

 

या होममध्ये माझ्या लक्षात आले की भारतीयांसारखीच चिनी पालकांची पाल्याच्या परीक्षेतील गुणांबद्दल खूप जास्त अपेक्षा असते. इथे शाळांना १ ते ३ असे बँड्स होते.  ब्रिटिश पद्धतीप्रमाणे इयत्ता ६ वी मध्ये एकदा मूल बँड १ शाळेत गेले की गंगेत घोडे न्हायले. बँड ३ च्या मुलांना मान नसे. त्यांना घरच्यांची घालून पाडून अशी बोलणी ऐकावी लागत असत. होम मधील सर्व मुले बँड ३ शाळेतील होती. मला वाटले की या मुलांना होमपेक्षा मार्गदर्शनाची (counseling) ची जरूर आहे. मी कॉउंसेलिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे ठरवले. ती पदवी घेतल्यानंतर बॉईज होम हलणार असे ज्यावेळी समजले त्यावेळी मी सुदैवाने स्पेशल एज्युकेशन मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होते. ते संपता संपता ते हलले. एवढे लांब जाणे कठीण होते आणि इंग्लिश बोलणाऱ्या मुलांचे दुसरे होम नव्हते त्यामुळे मी सिंगापूर इंटरनॅशनल शाळेमध्ये स्कूल कॉऊन्सिलरची नोकरी धरली. या अनुभवांमुळे कावलूनच्या होप सेन्टर मध्ये  कॉऊन्सिलर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 

 

आमच्या सहा वर्षांनंतर मंडळावर ज्या ज्या लोकांनी कमिटीमध्ये काम केले त्या लोकांचे कार्य खरोखरीच वाखाणण्यासारखे होते. त्यांनी मंडळाचा स्पोर्ट्स डे, नाटके, सहली यांतील उपस्थिती खूप कष्टाने वाढवली. खूप काही फार चांगले उपक्रम चालू झाले. मुग्धा करंजेकरने 'बोलतो मराठी' हा हाँगकाँग साठी अगदी अभिनव असा उपक्रम मोठ्या कष्टाने चालू केला आणि उत्तमरीत्या चालवला. अजून एक मला फार आवडणारा एक उपक्रम म्हणजे वाचनमात्रे. ही मुग्धाची कल्पना, सुनील कुलकर्णीनी फार कष्टाने राबवलेली. इथे आम्ही एक लेखक निवडून त्यांच्या लेखनातील काही भाग निवडून त्याचे अभिवाचन करत असू. सुनील, रेड्याच्या तोंडातून वेड वदवून घ्यावेत तसे काहीसे आमच्याकडून वाचन करून घेत. एकेका वाक्यावर प्रचंड कष्ट घेत. सुरवातीला आपण कस्पटापेक्षाही कमी आहोत असे वाटे आणि कार्यक्रम झाल्यावर 'हेच का ते आपण' असे वाटण्याएवढी प्रगती झालेली असे. यातून स्फूर्ती घेऊन हा कार्यक्रम आम्ही पुण्यातही चालू केला आहे. 

 

बाबा दरवर्षी चार महिने हाँगकाँग मध्ये राहत असत. मग ते कायमचे राहायला आले. आमच्यातले हॉन्गकॉन्गचे खरे स्थानिक म्हणजे बाबा. तुम्ही हे मुझियम पाहिलं का, ही बस कावलून टॉंग ला जायला इतकी सोयीची आहे, बाजारात लिच्या चांगल्या यायला लागल्या आहेत, आज ऍडमिरल्टीला जाऊ नका कारण अमुक कारणामुळे गर्दी असणारे वगैरे वगैरे सूचना बाबांच्या. आमच्याकडे पाहुणे आले की बाबा गाईड. 

 

आता पुण्याला आल्यावर नातेवाईक परके वाटतात. हाँगकाँगला असताना मंडळ, शिपिंग आणि कामाच्या जागा यांतील मित्रमंडळींनी नातेवाईकांची जागा आणि जबाबदाऱ्या घेऊन टाकल्या होत्या. आम्ही नसताना कुठल्याही कार्यक्रमाला मंडळी जाणार असली की बाबांना घरून घेऊन जाऊन, परत सोडण्यापर्यंतची जबाबदारी नाडकर्णी नाहीतर प्रधान घेत. कंटाळा आला की बाबा बस घेऊन वाघांकडे नाहीतर मावीलकांडींकडे जात. वाघ मंडळी दर वेळी बाबांनी फोन केला की गाडीने बस स्टॉपवर त्यांना आणायला जात. बाबांना डॉक्टरांची भेट घ्यायची असेल तर वोन्ग बॉन्ग व्यवस्था करत असे. 

 

२०१८ ऑगस्ट मध्ये आम्ही पुण्याला परतलो. आयुष्यभर पुरेल एवढे आठवणींचे आणि नात्यांचे गाठोडे घेऊन. याशिवाय या शहराने मुलांना उत्तम शिक्षण, कामाच्या उत्कृष्ट संधी, म्हणाल तो छंद/ शिक्षण जोपासण्याच्या सुविधा आणि बरेच काही दिले. आम्ही परतल्यावर दोनच महिन्यात हॉंगकॉंगमध्ये विरोध प्रदर्शने सुरु झाली. पुढे त्याला हिंसक वळण लागले. काही महिन्यातच परिस्थिती खूपच चिघळली. आयुष्याची सर्वात चांगली २८ वर्षे जिथे काढली त्या जागेची अशी अवस्था झालेली पाहून फार वाईट वाटले. हे शहर मुंबईसारखेच प्रचंड रेझीलियन्ट आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीतून ते पुन्हा सुस्थितीत जाईल अशी मला आशा आहे. 

 

- अरुणा साठे -सोमण

 

भाग १ मागील पानावर