Past Events


इस्टरच्या सुट्टीतील मराठी भाषा वर्ग २०२४



होळी २०२४

सालबादाप्रमाणे यंदाही मंडळाची होळी अनेक अडथळे पार करून छान पार पडली. यंदा सुमारे १५० लोकं उपस्थित होते.

होळीच्या कामांसाठी सिंहाचा वाटा उचलणारी टीम: शर्मिला कुळकर्णी, लीना पै, मनोज कुळकर्णी, अमित वाकडे, विनया साबळे, मुग्धा रत्नपारखी 

विविध कामांसाठी सहयोग:  शैलेश शिन्दे, परेश न्याती, मयुरा - हृषिकेश दिक्षित, संदीप/दीपाली भाटवडेकर, केतकी जोशी, देवेन ओक, विनया साबळे, मुग्धा/अमित रत्नपारखी, केतकी/ सुश्रुत बक्षी, सचिन/अश्विनी प्रधान, माधवी चावडा, प्राजक्ता/केतन नायक, विजय कुलकर्णी 

 

आयोजक आणि सर्व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार 


दिनांक 24 मार्च 2024 रविवार रोजी हॉंगकॉंग महाराष्ट्र मंडळातर्फे होली- दहनाचा आणि रंगपंचमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि ह्या कार्यक्रमाला हजर राहण्याचे भाग्य आम्हाला म्हणजे (कोयना बानोडकर) आणि माझी विहीण( प्रतिभा वेर्णेकर) यांना आमच्या मुलांमुळे (धनश्री आणि नंदन बानोडकर) मिळाले. हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय स्तुत्य, रंजक तर होताच आणि पारंपारिक रीतीने तो साजराही केला गेला... कौतुक वाटले ते ह्या गोष्टीचं, की परक्या मातीत, परक्या भूमीत आपलं अस्तित्व ठळक ठेवून, आपलं स्वत्व जोपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि त्या कार्यक्रमात, सर्वांना सहभागी करून त्या कार्यक्रमाचे साजरीकरण करणे हे अतिशय मोलाचं काम, हाँगकाँग महाराष्ट्र मंडळ गेली कित्येक वर्षे करीत आहे  हे भारतातून इथे,भेट देणाऱ्या आमच्यासारख्या पाहुणे मंडळींना अतिशय कौतुकास्पद तर वाटतंच, शिवाय अभिमानास्पद सुद्धा!! होळी सारख्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करताना, कार्यकारी मंडळ, सभासद, कार्यकर्तें, यांची गेल्या कित्येक दिवसांची चाललेली धावपळ/ मेहनत, कार्यक्रम स्थळाची निवड, सहभागी होणाऱ्या मंडळींना कार्यक्रमाच्या इच्छित स्थळापर्यंत नेण्या आणण्यासाठी केलेली बसच सोय, विविध खेळांचे आयोजन, सकाळचा सर्वांचा आवडता वडापावचा नाश्ता, दुपारचे चविष्ट जेवण, जेवतेवेळी कार्यकर्त्यांकडून होणारी अगत्यशील विचारपूस, प्रेमळ आग्रह, जेवणाआधीची पाणीपुरी हे खास आकर्षण.... हे सारंच कसं वाखाणंण्यासारखं!!

 

मंडळाकडून आपुलकीने होणाऱ्या आदर तिथ्याने, आम्ही पाहुणे खरोखरच भारावून गेलो आणि हे सर्व होत असताना "स्वच्छ भारत अभियान" हे त्यावेळी हॉंगकॉंगच्या त्या समुद्रकिनाऱ्यावरही अनुभवायला मिळत होते हे विशेष ! जेवणानंतर, कार्यक्रमाचा समारोप करताना, त्या भर उन्हांतही, तन मनाला शांती देणारी सुमधुर थंडाई प्यायला मिळाली ....होळीच्या पोळीचा प्रसाद घेऊन, प्रसन्न मनाने ,सुंदर आठवणी मनात जोपासून, प्रत्येक जण, आपापल्या घराच्या दिशेने मार्गस्थ झाला. खरंच एकूण सर्वच कार्यक्रम, कार्यकर्त्यांची मेहनत, सहभागी झालेल्या मंडळींचा उत्साह, सारंच काही, लक्षात ठेवण्यासारखं कौतुक करण्यासारखंच होतं... मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे, ज्यांनी ह्या कार्यक्रमांमध्ये अगदी खारीच्या वाट्यापासून सिंहाच्या वाट्यापर्यंत, स्वेच्छेने जबाबदारी स्विकारली, त्या सर्वांचे मनापासून कौतुक आणि मनःपूर्वक आभार ...असे सुंदर सुंदर कार्यक्रम हॉंगकॉंग महाराष्ट्र मंडळाकडून वारंवार आयोजित केले जावेत. त्या कार्यक्रमाला हजर राहण्याची संधी आम्हांला लाभावी आणि मंडळाचा कीर्ती ध्वज तिन्ही त्रिकाल, त्रिखंडात फडकत रहावा ही मनापासून सदिच्छा धन्यवाद.

 

-श्रीमती कोयना बानोडकर (ज्येष्ठ नागरिक)


क्रीडा दिन २०२४

क्रीडासमिती (राहुल पै, विनया साबळे, परेश न्याती) यांच्या पुढाकाराने MMHK Badminton and Table Tennis Tournaments आयोजित करण्यात आल्या. १९ स्वयंसेवकांनी या प्रसंगी कोर्ट आरक्षणासाठी अतिशय मोलाची मदत केली. तसेच अनेक स्वयंसेवकांनी क्रीडादिन उत्तम व्हावा यासाठी वेळ दिला. आपले सदस्य अतिशय उत्तम खेळतात आणि खेळ बघायला खरोखर मजा आली. 

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि कौतुक आणि स्वयंसेवकांचे आभार. 


Insights into the University Application Process 2024

विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती आणि अनुभवकथन असे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. ते ऐकण्यासाठी हॉंगकॉंग, भारत, सिंगापुर, कोरिया, थायलंड, नेदरलैंड्स मधून मुलं आणि पालक असे १२० लोकं सहभागी झाले. 

जून्या जाणत्या सदस्यांनी तर सुंदर मार्गदर्शन केलेच, पण तरूणाईने चर्चासत्र अक्षरशः गाजवले. 

 

मनःपूर्वक आभार

- Sandip Bhatawdekar

- ⁠Hemant Joshi

- ⁠Shailesh Shinde

- ⁠Dr Shilpa Patwardhan

- ⁠Sanyukta Gupta (Arena Education)

 

Younger Generation 

- Sanika Kulkarni 

- ⁠Sandeepti Singh 

- ⁠Anannya Dixit 

- ⁠Tvesha Kumar

Flyer : Prajakta Nayak

Moderation & Speaker Followups: Mugdha Ratnaparkhi 

Tech Support: Amit Ratnaparkhi


चिनी नववर्षातील मराठी भाषा वर्ग २०२४

चिनी नववर्षाच्या सुट्टीत लहान मुलांसाठी मराठी भाषा आणि अक्षरओळख -१ चा वर्ग संपन्न झाला. मराठी भाषेतील सोप्या संभाषणावरून मुलांची गाडी आता देवनागरी लिपी शिकण्यापर्यंत आली आहे. या टप्प्यावर शिक्षक आणि पालकांची भरपूर मदत लागते.


वेचक - वेधक, मराठी म्हणी आणि वाक्प्रचार- मराठी भाषा दिवस २०२४

यंदा “ मराठी म्हणी आणि वाक्प्रचार” व्हिडिओ सादरीकरणाचा उपक्रम आपण हाती घेतला. आपल्या उत्साही सदस्यांनी उत्तम व्हिडिओ तयार  करून डकवले.

“भाडिपा पेक्षा जास्त views तिकडे येत होते” अशी प्रतिक्रिया आली ती उगाच नाही. हा उपक्रम आवडल्याचे अनेकांनी आवर्जून कळवले, त्यासाठी त्यांचे मन:पूर्वक आभार !

 

या निमित्ताने अनेक जुन्या नव्या म्हणींना उजाळा मिळाला, आपल्याच मातृभाषेच्या एका पैलूची आठवण झाली आणि कलाकार मंडळीच्या कल्पकतेला धुमारे फुटू लागले. आसमंतात जरा चैतन्य आले. कलाकार मंडळींने आई—आजी- जुन्या पिढीला म्हणींसाठी पाचारण केल्याचे वृत्त कानी आले. तसेच व्हिडिओ तयार करण्यासाठी एकमेकांना प्रत्यक्ष भेटावे लागले आणि त्यातून काही सुंदर- काही गमतीशीर किस्से स्मृतीपटलावर कोरले गेले. 

२०२४ उपक्रम श्रेयनामावली

- उपक्रमाची संकल्पना आणि पाठपुरावा:  मुग्धा रत्नपारखी 

- पत्रक: प्राजक्ता नायक


दिवाळी २०२३

महाराष्ट्र मंडळाचा दिवाळी कार्यक्रम आपल्या कलेने उजळून टाकणा-या सर्व कलाकारांचे मन:पूर्वक आभार आणि कौतुक. 

तसेच सर्व स्वयंसेवकांचे आणि विशेषतः राजश्री वाकडे यांचे प्रायोजकांशी संधान बांधण्यासाठी विशेष आभार.


गणेशोत्सव २०२३


उन्हाळी सुट्टीतील मराठी भाषा वर्ग २०२३



क्रीडा दिन २०२३

राहुल पै, परेश न्याती, विनया साबळे यांच्या पुढाकाराने आज क्रीड़ा दिन उत्तमरीत्या संपन्न झाला. 

क्रीडा समितीचे, प्रेक्षकांचे आणि सर्व सहभागी झालेल्या सदस्यांचे मनःपूर्वक आभार. विजेत्यांचे अभिनंदन. 

ज्यांच्या पुढाकाराने जागेचे आरक्षण होऊ शकले त्या सर्व स्वयंसेवकांचे आभार : विनया आणि रोहित साबळे, शैलेश शिंदे, राहुल पै, परेश न्याती 



होळी २०२३

MMHK होळी / रंगपंचमीचा कार्यक्रम  चार वर्षांच्या खंडानंतर विक्रमी उपस्थितीत पार पडला.

आपल्या विस्तारीत समितीचे आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार : 

न्याहरी, पुरणपोळी, जेवणाचे आयोजन, भारतातून मागवायचे खाद्यपदार्थ, कुरियर, तृणधान्याच्या पदार्थांच्या चाचण्या, थंडाईचे आयोजन आणि चाचण्या : शर्मिला कुळकर्णी

३ बसचे आयोजन: देवेन ओक 

बसस्वयंसेवक : राहुल पै, नितिन राजकुवर, देवेन ओक

कार्यक्रमाचे पोस्टर : प्राजक्ता नायक

तृणधान्य पोस्टर : डिझाईन (प्राजक्ता नायक), मजकूर (मुग्धा रत्नपारखी), छपाई (मंदार पटवर्धन), कल्पना ( शर्मिला कुळकर्णी)

खेळांचे आयोजन : परेश न्याती, विनया साबळे, अनुराधा पुराणिक

स्थानिक पोलिसठाण्यात नोंदणी करणे : नितिन राजकुवर 

पूजेचे साहित्य : दीपाली भाटवडेकर 

रंगांचे आयोजन : मयुरा दिक्षित 

तूप : केतकी काळे, दूध : लीना पै, इतर सामान: मयुरा दिक्षित, दीपाली भाटवडेकर, राहुल पटवर्धन, मुग्धा रत्नपारखी 

तीस किलोची ध्वनिक्षेपण व्यवस्था : विनया आणि रोहित साबळे 

जागेची चाचणी/ पहाणी: लीना पै, मयुरा दिक्षित, मुग्धा/अमित रत्नपारखी, केदार /केतकी जोशी, देवेन/ शीतल ओक, उमेश/संगीता कारेकर 

हरकामे : राहुल पटवर्धन/ मुग्धा रत्नपारखी/ अमित वाकडे 

वेळेवर मदत करणा-या, जेवण वाढू लागायला, सामान उचलू लागायला, कचरा उचलू लागायला मदत करणा-या सर्व स्वयंसेवकांचे आभारः डॉ शिल्पा पटवर्धन, डॉ मनमोहन सिंह, डॉ शिवानी आणि डॉ सलील शिंदे, डॉ कांचन राव, डॉ लिपिका चक्रवर्ती, शिल्पा जोशी, आर्या-केदार-केतकी जोशी, अमित रत्नपारखी, संदीप भाटवडेकर, भुषण आणि वैदेही पाटील, रोशन डिसुझा, पंकज नेल्सन, सोनी नुनेस, शैलेश शिंदे, धनश्री बानोडकर, केतकी बक्षी, सोनल कुलकर्णी, स्वप्नल गडणीस, विजयेंद्र दरोडे आणि इतर आपले सदस्य कुटुंबिय.



चिनी नववर्षातील मराठी भाषा वर्ग २०२३

चिनी नववर्षातील मराठी वर्ग उत्तमरित्या पार पडला.  दोन batches सुरू झाल्या. सहभागी होणारी मुलं : १३.  मुलांनी मराठी शिकावं यासाठी प्रयत्नशील असणा-या त्यांच्या पालकांचे कौतुक आणि आभार. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून यंदा राष्ट्रगीतावर भर आहे, आणि देश, राज्य, झेंडा, शिवाजी महाराज, क्रांतिकारक यांच्या गोष्टींची निवड करण्यात आली आहे.




बॅडमिंटन २०२२


दिवाळी २०२२

आपली दिवाळी पार्टी स्थानिक नियमावली पाळून शक्य तेवढ्या धडाक्यात १६० लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सर्व स्वयंसेवक आणि प्रायोजकांचे आभार. 

यंदा पहिल्यांदाच सुमारे २० टीनेजर उपस्थित होते हे विशेष. पुढील पिढीपर्यंत मैत्रीचे बंध निर्माण झालेत ही आनंदाची बाब आहे. 

 

विशाल कामत यांनी अमिताभ बच्चन च्या चित्रपटांवर आधारित Housie सादर करून धमाल उडवून दिली. गिरिधर धुमाळ यांनी Mentimeter वापरून एक परिचयात्मक खेळ घेतला. अश्विनी प्रधान यांनी दिवाळी आणि हॉंगकॉंगवर आधारित Kahoot प्रश्नमंजुषा सादर केली. महाराष्ट्र मंडळाचा वार्षिक अहवाल आणि जमाखर्च सादर करण्यात आला. राजश्री वाकडे यांच्या सौजन्याने अनेक प्रायोजकांनी बक्षिसे ठेवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि कलाकारांनी आपले नृत्य व्हिडिओ द्वारे सादर केले.

 



गणेशोत्सव २०२२

या वर्षी हिंदू मंदिराच्या नुतनीकरणाच्या कामामुळे गणेशोत्सव जरा नेहमीपेक्षा लहान प्रमाणात करावा लागला. तरीही चार वेगळ्या कार्यक्रमात सुमारे २३० लोकं समाविष्ट झाले. सोनल कुलकर्णीने पौरोहित्याची जबाबदारी पहिल्यांदा घेतली आणि उत्तमरित्या पार पाडली. लहान मुलांनी “स्वरवंदना” कार्यक्रमात यंदा पहिल्यांदा गायन सादर करून कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत केली. 

जयराम परमेश्वरन् आणि सुश्रुत बक्षी यांनी मुलांना मार्गदर्शन केले आणि त्यांना साथ केली. 

पालवी बापट दाणी या हॉंगकॉंगमध्ये नवीन आलेल्या कसलेल्या कलाकार आहेत. त्यांचे गायन उपस्थितांचे कान तृप्त करून गेले. 

 

महाराष्ट्र मंडळ हॉंगकॉंगच्या सदस्यांनी सढळ हाताने केलेल्या मदतीने आपण हिंदू मंदिराला १५,००० HKD ची नूतनीकरणासाठी देणगी देऊ शकलो. 

गणेशोत्सव नेहमीसारखाच आनंदाने, उत्साहाने, सर्वांच्या सहकार्याने संपन्नं झाला. सर्व स्वयंसेवक, देणगीदार, कलाकार यांचे मनःपूर्वक आभार.

 



मराठी भाषा उपक्रम २०२२

नाताळाच्या, चिनी नवनर्षाच्या आणि इस्टरच्या सुट्टीत तीन छोटेखानी हसत -खेळत मराठी वर्ग झाल्यानंतर पालकांच्या आग्रहाखातर आठवड्यातून एकदा ‘मराठी भाषा आणि अक्षरओळख’ वर्ग मे-जून २०२२ मध्ये संपन्न झाला. दोन महिने शनिवारी सकाळी वर्ग असला तरी (येणारे पाहुणे, ठरलेल्या पार्ट्या, सॉकर- नाच-टेनिस इत्यादि कारणांसाठी ) दांड्या मारणार नाही, गृहपाठ करायला मुलांना मदत करणार अशी उभयपक्षी बोलणी झाली. पालकांनी दिलेला शब्द तंतोतंत पाळला. 

आणि परवा सकाळी परिक्षा सुद्धा संपल्या की !!

 

आठवणीसाठी हा एक छोटा व्हिडिओ.

 

मुलं, मराठी भाषेविषयी आत्मियता बाळगणारे त्यांचे पालक आणि आपल्या लोकप्रिय शिक्षिका *प्रीती धोपाटे* यांचे मनःपूर्वक आभार. 

संयोजक आणि स्वयंसेवक : मुग्धा रत्नपारखी, सोनल कुलकर्णी, प्राजक्ता नायक



गप्पा

१ मे २०२२ रोजी हॉंगकॉंग येथे वास्तव्य असणा-यांनी इच्छापत्र का, कसे, कधी करावे हा कार्यक्रम संपन्न झाला.

सोनल कुलकर्णी आणि अमृता हर्डीकर या आपल्या वकील सदस्यांने सुमारे तीन तास सदस्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराला शांतपणे उत्तरे दिली आणि क्लिष्ट भासणारा विषय सोपा करून सांगीतला. त्याआधी महिनाभर सोनल कुलकर्णी आणि मुग्धा रत्नपारखी, अमित वाकडे कार्यक्रमाच्या आखणीविषयी चर्चा करीत होते. सोनल कुलकर्णी यांनी आवर्जून आमंत्रित केलेल्या तज्ज्ञ पाहुण्यांने उपस्थितांचे उत्तम शंकानिरसन केले. संगीता कारेकर यांनी आपला अनुभव सांगीतला. सिद्धार्थ फडके यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. प्राजक्ता नायक यांनी Flyer Design केले. 

We are deeply grateful to our guest Speakers Mr. Mark Kirkham and Ms. Bharati Manek for sharing the wealth of their insights and to Sonal Kulkarni for inviting them.

कार्यक्रमानंतर अंजली पेठे यांनी पुढाकार घेऊन एका Solicitor Firm शी संपर्क साधून सर्वांची वाट सुकर केली आणि त्यायोगे आता सुमारे ५५ इच्छापत्रे तयार होण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. हृषिकेश दीक्षित यांनी वाटाघाटी पुढे न्यायला मदत केली. अनेक सदस्यांनी आपला अनुभव शेअर केला, आपल्या मित्रमंडळींनाही त्यात गोवले त्यामुऴे इतरांनाही मदत झाली. 

 

किती जणांचे हात एका उपक्रमाच्या पालखीला लागतात आणि मनावर घेतले तर आपण महत्त्वाची कामे कशी तडीस नेऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण. सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि कौतुक. कोणावरही आकस्मिक मृत्युचा अवघड प्रसंग ओढवू नये, पण तरीही कायदेशीर बाबींची पूर्तता व्हायलाच हवी. आपण शक्यतोवर व्यवस्था नीट करून ठेवावी. 

 

एकमेंका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ !

 



छंदवर्ग इस्टर २०२२


मराठी भाषा दिवस- कविता पानोपानी २०२२

‘कविता पानोपानी ‘ ह्या उपक्रमात यंदा ४७ प्रवेशिका आल्या. अनेकांनी अतिशय धडपड करून त्या पाठवल्या. आजारपणात किंवा नव्वा लागला असताना कोणी धडपड करून सहभागी होतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण कोणी फार वर्षांनी कागदाला पेन टेकवलं आणि कोणी मुलांच्या मागे धोशा लावून त्यांच्याकरवी काम पूर्ण केले. कोणाला शब्दांशी, कोणाला उच्चारांशी, कोणाला अक्षराशी, कोणाला तंत्रज्ञानाशी काहीशी झटापट करावी लागली. पण मंडळी त्यात रमली… काही काळ सभोवतालचा अभूतपूर्व गोंधळ जरासा विसरली… कल्पकतेने, रसिकतेने, आपल्या कुठल्या कुठल्या सुहृद नातेवाईकांच्या आठवणीं समवेत, टपो-या अक्षरांसमवेत, सुंदर चित्रांसमवेत आपण ह्या उपक्रमात मनापासून सहभागी झालात.  

त्या निमित्ताने जुन्या- नव्या- परिचित- अपरिचित मराठी कवितांना उजाळा तर मिळालाच पण शीणलेल्या मनालाही मूठभर चैतन्य मिळाले. 

आणि एवढ्या थंडीत आपल्या भाषेची ऊब काय असते ती सर्वांनाच जाणवली. 

आज 21 फेब्रुवारी , जागतिक मातृभाषा दिवस, International Mother Languge Day. 

 

- मुग्धा रत्नपारखी, अध्यक्ष

 



छंदवर्ग चिनी नववर्ष २०२२


गप्पा

८ जानेवरी २०२२ रोजी , महाराष्ट्र मंडळा ने  HKEOC समवेत एक माहितीपर कार्यक्रम आयोजित केला – “Are you protected from Discrimination”.  त्यावेळच्या स्थानिक नियमांनुसार तो कार्यक्रम प्रत्यक्ष न करता आल्यामुळे झूम (Zoom) वर झाला. कार्यक्रमाला साधारण ३५ कुटूंबे हजर होते.

“Equal Opportunities Commission(EOC)” च्या श्रीमती निरू विश्वनाथ ह्यांनी ह्या महत्त्वपूर्ण बाबीं विषयी अतिशय शांतपणे, सोप्या भाषेत सगळी माहिती दिली. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. कार्यक्रम परस्परसंवादी होता त्यामुळे इंट्रेस्टिंग झाला.

EOC is a statutory body responsible for implementing the Sex, Disability, Race, Family status discrimination ordinance in Hong Kong.

हाँगकॉंग मध्ये आल्यापासून, स्थानिक लोकं आपल्याशेजारी (बस , MTR इत्यादि) बसणे का टाळतात या पासून ते भाषेच्या अडसरामुळे सहजासहजी नोकरी न मिळणे. कार्यालय ,शाळा ,विद्यापीठ अशा ठिकाणी समावेशक वातावरण नसणे..अशा अनेक त्रासदायक घटना अनुभवास येतात. ह्यातल्या कुठल्या घटना ह्या ‘भेदभाव‘ ह्या श्रेणीत धरल्या जातात ? कुठल्या गोष्टींसाठी ‘न्याय’ मागितला जाऊ शकतो ? ह्याची माहिती निरू मॅडमने सविस्तर दिली.

आपल्यावर अन्याय होत असताना : तो सहन करणे, दुर्लक्ष करणे, हतबल होणे,आपापसात नुसतीच चर्चा करणे, ह्या पलीकडे जाऊन आपल्याला न्याय मागता येऊ शकतो ही बाब दिलासा देणारी आहे.

निरू मॅडम ने सांगितल्याप्रमाणे आपली तक्रार आधी ऐकली जाते. मग ती तक्रार ‘भेदभाव’ ह्या श्रेणी मध्ये ग्राह्य धरली जाऊ शकते का हे पडताळून त्याची नोंद केली जाते. पुढे शहानिशा करून त्यावर कृती केली जाते.

भेदभावाच्या घटनेच्या तीव्रतेनुसार आपल्या मानसिक आणि परिणामी शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. आपल्याला सामावून घेण्यात यावं म्हणून आपण स्वतःची जीवनशैली बदलायचा प्रयत्न करतो, भाषा शिकायचा प्रयत्न करतो. कितीही आटापिटा केला तरी शेवटी आपण वेगळे रहातो. 

आपापसातील छोटे छोटे भेदभाव बाजूला सारून एकजुटीने आपण भारतीय आहोत ही भावना ठेवून EOC च्या मदतीने न्याय मिळवू शकतो. महाराष्ट्र मंडळाने अतिशय उपयुक्त कार्यक्रम आणल्याबद्दल मंडळाचे आभार .

 

- श्रीनिधी डोंगरे

 



छंदवर्ग नाताळ २०२१


दीपावली २०२१


नवदुर्गा


गणेशोत्सव २०२१

परवा दिवशी महाराष्ट्र मंडळ हाँग काँगचा गणेशोत्सव यशस्वीरीत्या पूर्ण झाला - यशस्वीरीत्या अशा करता म्हटलं, कारण सर्व सदस्यांनी पुरेपूर आनंद अनुभवला. गेल्या १.५ वर्षातील घडामोडींचा काही तास विसर पडला, भेटी-गाठी झाल्या, छान भारतीय पोशाख बाहेर आले, लहान मुलांना "आपली" माणसं म्हणजे कोण, "आपली माणसं" म्हणजे काय आणि "आपली संस्कृती" कशी वेगळी याचा अनुभव आला. गेल्या वर्षीपासून घरात आपण बोलतो ती भाषा घराबाहेर इतक्या मोठ्या प्रमाणावर ऐकू येणे हा मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही दुर्मिळ अनुभव झाला होता. 

 

मंडळाचा "स्वरवंदना" हा वार्षिक संगीत सोहळाही उत्तम झाला, त्याविषयी कौतुकाचे शब्द अजूनही मंडळाकडे येणं थांबत नाहीये. प्रसन्न वातावरणात मंडळाच्या हौशी कलाकारांनी, आपल्या स्वतःच्या पात्रतेला सुयोग्य न्याय देत, २.५ - ३ महिने तालमी करून मनापासून आपली कला सादर केली. खूप कौतुक झालं. 

 

मी यावर्षी प्रथमच निवेदिकेची भूमिका केली आणि काही नवीन गोष्टी लक्षात आल्या. स्टेजवरच्या प्रत्येकाला भूमिकेनुसार प्रेक्षक हा वेगळा भासतो, त्याच्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात. गायक-गायिका प्रेक्षकांकडून समेवर टाळी, नेमक्या लागलेल्या सुराला दाद, आणि चुकांना दिलदारपणे केलेली क्षमा शोधत असतात. वादक हे गायकाइतकेच कसलेले कलाकार असले तरी नेहमीच आपली गायकापुढे असलेली दुय्यम भूमिका नम्रपणे स्वीकारून, प्रेक्षकांकडून वादन-गायन या सहयोगासाठी दाद शोधत असतात, मात्र मनाच्या एका कोपऱ्यात कोणीतरी फक्त आपलं वादन ही कान देऊन ऐकावं अशी आशा करत असतात. निवेदकाला मात्र कार्यक्रम मार्गावर ठेवण्याचं कर्तव्य करत असताना काहीतरी वेगळंच दिसत असतं, समजत असतं. 

 

समोर बसलेल्या समुदायाचा सामूहिक मूड, कल, इच्छा अशा सर्व गोष्टी अचानक दिसायला लागतात आणि एकदम कळतं की ही सर्व माणसं कलाकारांविषयी अत्यंत चांगल्या भावना, सदिच्छा मनात ठेवून आहेत. बघा ना - कार्यक्रम चांगलाच असेल असा छान विचार मनात असल्याशिवाय एखादी व्यक्ती कार्यक्रमाला येणारच नाही! यावर्षी त्याचा पुरेपूर अनुभव घेतला. मंडळाचे प्रेक्षक होतेच खास - जवळ जवळ २ तास चाललेल्या कार्यक्रमात प्रत्येक क्षणी समरसून गेलेले प्रेक्षक मी पाहिले. सुरा-सुराला दाद, समेवर दिसलेली बोलकी देहबोली, निवेदनातल्या हलक्याफुलक्या क्षणांमध्ये चेहऱ्यांवर सहज उमटलेलं स्मितहास्य, उत्स्फूर्त असे अनेक वन्स मोअर, आणि कार्यक्रम झाल्यावर मुक्तहस्ते केलेली कौतुकाची उधळण - प्रेक्षक असावे तर असे! 

 

मंडळातील व्यासपीठावर संगीताचे कार्यक्रम हे सांगीतिक गुणवत्तेच्या मोजपट्टीवर किती खरे ठरतात या पेक्षा ते माणसांना किती जवळ आणतात हे महत्वाचं असतं असं मला वाटतं. समोर सादर केली जाणारी गाणी ही प्रेक्षकांना त्यांच्या समान असलेल्या रम्य भूतकाळात नेतात का, हा त्यातला एक महत्वाचा भाग ठरतो. प्रेक्षक हा समोर असलेला क्षण जगताना तितकाच जेव्हा आपल्या आठवणींमध्ये रमतो, तेव्हा कार्यक्रम चांगला होतो. त्याशिवाय आपल्या आजूबाजूला असणारे आपल्या आवडीचे आणि आपली भाषा बोलणारे परिचित, हवेत ओळखीचा पवित्र सुगंध, गुंतवून ठेवणारी; कानाला आनंद देणारी ध्वनी योजना, आणि डोळ्याला दिसणारे भारतीय रंगातले कपडे - हे आणि इतर अनेक डायमेन्शन असलेला परिपूर्ण अनुभव हा कार्यक्रम देतो. कार्यक्रमात घेतलेले फोटो आणि विडिओ हे कितीही आवडले तरी त्या फक्त तुटपुंज्या आठवणी असतात, आणि ते आवडले नाहीत तरीही ती फक्त क्षणचित्र आहेत, परिपूर्ण अनुभव नाही हे लक्षात घ्यावं लागतं.

 

एकंदर काय, सगळंच छान झालं यावर्षी आणि पुढच्या वर्षीचे लागलेले वेध हवेत दिसत आहेत! 

 

मंडळाचे आभार, कलाकारांचे आभार, फोटोग्राफर्सचे आभार, आणि प्रेक्षकांना जोरदार सलाम!

 

©️सौ. केतकी बक्षी



अथर्वशीर्ष



सामना कौशल्ये कार्यशाळा

डॉ. शिल्पा पटवर्धन यांनी घेतलेली ‘सामना कौशल्ये कार्यशाळा’ आज उत्तमरित्या संपन्न झाली. जे हॉंगकॉंगमध्ये अनेक वर्ष स्थायिक आहेत त्यांना ठाऊक असेल की मानसिक आरोग्यासंदर्भातील ३ तासांची कार्यशाळा आणि समवेत course materials या token प्रवेशमुल्यात फारच कमी मिळू शकतील.  थियरी कुठेही मिळेल पण आपल्या व्याख्यात्यांचे ज्ञान, सहवेदना, मराठी मनाची जाण, मदत करण्याची वृत्ती इथे सहजासहजी मिळणार नाही. आज आलेल्या प्रतिक्रियांमधूनच आपल्या कार्यशाळेचे यश सामावले आहे



मराठी भाषा आणि अक्षर ओळख



स्नेहमेळावा २०२१

विशाल आणि योगिता कामत (आणि कार्यकारिणीचे सदस्य ) यांच्या पुढाकाराने  ४ जुलै २०२१ रोजी एक छोटेखानी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. अनेक नवे आणि जूने सदस्य या प्रसंगी उपस्थित होते. कोविड काळातील नियमावलीमुळे अतिशय काळजीपूर्वक कडेकोट बंदोबस्तात आणि मर्यादित स्वरूपात सुमारे दीड वर्षानंतर आपली भेट होऊ शकली हे ही नसे थोडके. 

सतत बदलणा-या नियमावली मुळे कुठलेही आयोजन पूर्वीइतके साधे, सोपे, सरळ राहिले नाही याची सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी.

 



बॅडमिंटन २०२१

सुमारे ६० व्यक्तींनी (लहान मुले धरून) Badminton  स्पर्धेला उत्तम प्रतिसाद देऊन स्पर्धा उत्तम रितीने पार पडल्या. कोर्ट बुकिंगसाठी स्वयंसेवकांना पहाटे ४:३० पासून रांगेत उभे राहून आरक्षण करावे लागले. राहुल पै आणि विशाल कामत यांच्या पुढाकारामुळे या वर्षीच्या Badminton स्पर्धा उत्तम रितीने पार पडल्या आणि खर्च वजा करून २,००० हॉंगकॉंग डॉलर निधी उभारला गेला. यात मंडळानेही तेवढीच भर घालून, निधी सामाजिक कार्यासाठी देण्याचे निेश्चित केले आहे. 

आपल्याकडे किती उत्तम खेळाडू आहे हे या निमित्ताने लक्षात आले.

 



मराठी भाषा आणि अक्षरओळख १



‘व्हय मी सावित्री’ या एकल नाटकाचा प्रयोग

‘व्हय मी सावित्री’

लेखिका - सुषमा देशपांडे

दिग्दर्शन- सुनील कुलकर्णी

कलाकार- केतकी जोशी

संगीत- सिद्धार्थ फडके 

 

‘व्हय मी सावित्री’ या एकल नाटकाचे ४ प्रयोग २८ मार्च २०२१, १० एप्रिल २०२१, १ मे २०२१ आणि ७ ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झाले.

Social distancing चे अनेक नियम, सभागृहाची नियमावली, प्रमुख कलाकारांची कोविड चाचणी ही सर्व यातायात केल्यावर , सुमारे १००+ प्रेक्षकांनी प्रत्यक्ष हजर राहून नाटकाला उत्तम प्रतिसाद दिला.

 

१ मे २०२१: ‘व्हय मी सावित्री’ च्या प्रयोगाचा वृत्तांत :

प्रे़क्षकांचे ओघळणारे अश्रु, वाजणार्या टाळ्या आणि शिट्ट्या, उस्फूर्त व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया, प्रेक्षागारातील संपूर्ण शांतता, एकमेकांशी आपुलकीने बोलणारे सदेह लोक, महाराष्ट्रदिनाला म्हटलेले महाराष्ट्र गीत, दिग्दर्शक- कलाकार यांच्या मेहनतीला आणि सादरीकरणाला दिलेली पोचपावती. अनेक अडचणींतून मार्ग काढत हा ही ‘प्रयोग’ संपन्न झाला. 

‘नाटक’ सुफळ झाले. 

संपूर्ण होऊ नये ही नटराजाचरणी प्रार्थना.




गप्पा

मराठी भाषा दिवसानिमित्ताने, प्रसिद्द सुलेखनकार, अच्युत पालव, यांचं देवनागरी आणि रोमन लिपीवर सुंदर प्रात्यक्षिक केलं आणि श्रोत्यांबरोबर सुसंवाद साधला.

 



गप्पा

महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या Zoom व्याख्यानात श्रीमती अंजली हजारी यांनी पालकांना आणि मुलांना मार्गदर्शन केले. 

शिस्त, अभ्यासू वृत्ती , पूर्वतयारी आणि पालकांची भूमिका या बदलत्या काळात काय असावी या विषयी त्यांनी मते मांडली.

 



छोटेखानी Hike

हॉंगकॉंगमध्ये कोविडप्रसाराचा धोका कमी झाला, जराशी उसंत मिळाली तसा एप्रिल महिन्यात Easter Break मध्ये एक छोटेखानी Hike आयोजित करण्यात आला. 

आपल्या सदस्यांने उत्साहाने हजेरी लावून तो यशस्वी केला.

 



पुस्तकविश्व

 या वर्षी सुमारे २० मुलांनी आपल्या आवडत्या मराठी पुस्तकावर / गोष्टीवर आधारित व्हिडिओ सादरीकरण तयार केले. पंचतंत्रापासून ते फास्टर फेणे ते माधुरी पुरंदरेंच्या बालसाहित्यापर्यंत पुस्तकांचा यात समावेश होता. मुलांनी उत्तम व्हिडिओ सादरीकरण केले. सक्रीय सहभागासाठी मुलांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. नवीन पिढीला मराठी गोष्टी/ पुस्तके आवडतात हे या निमित्ताने लक्षात आले.



गप्पा

डॉ शिवानी आणि डॉ सलिल शिंदे यांनी वैज्ञानिक ऐतिहासिक प्रयोग, मानवी शरीराची रोगप्रतिरोधक शक्ती , विषाणूंची रचना, सध्या उपलब्ध असलेल्या / केल्या जाणार्या विविध कंपन्यांच्या लशी आणि तंत्रज्ञान, लसीकरणाविषयीचे समज, गैरसमज, यावर इंग्रजीत विस्तृत व्याख्यान दिले. उपस्थित १०-१९ वर्षांच्या बाल-युवा पिढीने धडाधडा प्रश्न विचारून त्यांना घेरून टाकले. दोन्ही डॉक्टरांनी सर्व प्रश्नांना अतिशय विस्तृत उत्तरे दिली.

 

या व्याख्यानासाठी त्यांनी खास slides तयार केल्या होत्या, ज्यांच्या मदतीने प्रेक्षकवर्गाला हा विषय समजण्यात मदत झाली आणि कोविड लशी बाबतीत अनेक शंकांचे निरसन होऊ शकले.



संक्रमण २०२१

कार्यक्रमाची क्षणचित्रे 

गतसालचे अहवाल वाचन आणि नवीन समितीची ओळख 

  • अनघा जोशी - गायिका, शारदास्तवन (जय शारदे वागीश्वरी)
  • Transitioning to University: Vidit Bhatawdekar (University of California, Berkeley)
  • जान्हवी चंदात्रे (श्रीहान चंदात्रे ‘Virtual बोरन्हाण’)
  • प्रदीप आणि स्मिता लाड (३० वर्षातील हाँग काँगमधील विविध स्थित्यंतरे, येथील ‘रुढीप्रिय स्थानिक समाज’ आणि ‘money, money’ संस्कृती)
  • संदीप भाटवडेकर (२० वर्षातील कौटुंबिक आणि हाँग काँगमधील स्थित्यंतरे, कमावलेले आणि गमावलेले काही)
  • वर्षा कुलकर्णी (५ वर्षे हाँग काँग मध्ये स्वत:चा व्यवसाय रजिस्टर करतानाचे challenge)
  • प्राजक्ता नायक (५ वर्षे हाँग काँग-क्वाला लंपूर - मुंबई संक्रमणाची आणि trailing spouse ची गोष्ट)
  • तेजस मोरे (सुमारे दीड वर्षातील हाँग काँग मधील कडूगोड अनुभव)
  • अमित रत्नपारखी (हाँग काँगमधील स्थलांतरीत पक्षी आणि पक्ष्यांची मनोहारी दुनिया)
  • सुनील कुलकर्णी, रंगकर्मी (अभिवाचन 'खरेमास्तर' ,सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने)
  • नवीन सदस्यांचे स्वागत आणि परिचय 
  • ‘चितळे बंधूंची उत्पादने’ हाँग काँगमध्ये लवकरच!!!
  • आगामी कार्यक्रमांची रूपरेषा, स्वप्नें