बोलतो मराठी

आधी बीज एकले

 

‘बोलतो मराठी’ हा लहान मुलांसाठी मराठी भाषाविषयक उपक्रम काही वर्षांपूर्वी मी सुरू केला. नक्की आठवत नाही पण २०१५ साल असावे. त्या वेळेला मी आणि काही उत्साही व्यक्तींनी मुलांचा मातृभाषेशी संपर्क कायम रहावा या उर्मींने सुरू केलेला तो वर्ग होता. त्या वेळेस मंडळाने मराठी वगैरे शिकवायची जबाबदारी घेऊ नये असा मतप्रवाह असणारा एक गट होता, आणि शेवटी हा आम्ही खाजगी उपक्रम म्हणून चालवला आणि जमेल तसा अजूनही चालवतो. महाराष्ट्र मंडळ हॉंगकॉंगने मुलांना मंच मात्र होताहोईलतो उपलब्ध करून दिला.

 

महाराष्ट्रातील घडामोडींशी, मराठी भाषेशी, आपल्या आजीआजोबाभारतातल्याभावंडांशी संवाद साधता येईल इतपत मराठी त्यांना यावं, यासाठी हा प्रयत्न अजूनही सुरू आहे. माझा भर मराठी गाणी, कविता, गोष्टी, श्लोक, पाठांतर याद्वारे मुलांशी संवाद साधणे याकडे असतो. भारतातून पालकांची अचानक बदली झाल्यामुळे आणि इकडील जीवनपद्धती आणि शाळेत रुऴे पर्यंत मुलांना मनातला सांगायला एखादी सुरक्षित जागा असावी असं फार वाटतं. इथे Mandarin आणि Spanish, French शिकायला उत्सुक असणारी मुलं, मराठीच्या बाबतीत उदासीन होऊ नयेत यासाठी खास प्रयत्न करावे लागतात. ते आपोआप होत नाही.

 

या उपक्रमात संख्याने जास्त मुलं नाहीत तरीही जी आता आहेत, त्यांचे पालक माझ्यासोबत ठामपणे आहेत म्हणून उपक्रम सुरू आहे. गेल्या काही वर्षात अनेक लोकांनी जगभरातून संपर्क साधला आणि जमेल तशी आम्ही एकमेकांना मदत केली. हॉंगकॉंगमध्ये मुलांनी भारंभार गोष्टींमध्ये भाग घेणे आणि त्यामुळे मराठी साठी वेळ न काढू शकणे हे घडते, आणि दुसरं कारण म्हणजे जागेचा कमतरता. गेली अनेक वर्ष माझ्या घरीच वर्ग घ्यावा लागतो.

 

तरीही, या उपक्रमाद्वारे काही अतिशय आनंदाचे क्षण आम्ही सोबत वेचले त्याबाबत मी फार समाधानी आहे. या मुलांसोबत आणि त्यांच्या पालकांसोबत मीही मोठी होत गेले.

 

आम्ही एकत्र महाराष्ट्र गीत, पसायदान, गणपती अथर्वशीर्ष, कविता, पु.लं, गीतरामायण, ज्ञानेश्वर-रामदास-तुकाराम, ते पार दुष्काळ आणि पाणी फ़ाऊंडेशन अशा विविध विषयांना हात घालू शकलो. मुलांना या विषयांची तोंडओळख का होईना करून देऊ शकलो. पुरणपोळ्या, गोपाळकाला, लिंबू सरबत, भेळ करून पाहू शकलो. जमेल तसे आणि तितके हे मराठीचे बीज रोवायचा प्रयत्न केला आणि करत राहू.

 

- मुग्धा रत्नपारखी