स्मृतीचित्रे- श्री प्रदीप लाड


हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाची (अनधिकृत) स्थापना नक्की कधी झाली, हे ठाऊक नाही. पण येथील काही जुन्या सभासदांच्या नोंदींवरून असे वाटते, की ती १९८१- ८२ च्या दरम्यान झाली असावी.

 

मी मंडळांत १९९१ साली दाखल झालो. तेव्हा व नंतर अनेक वर्षे मंडळ अतिशय लहान होते, सर्व मिळून जेमतेम १५ ते २० कुटुंबे असत. तरीही काही ठराविक कार्यक्रम अगदी उत्साहाने केले जात. ह्यात काही बंदिस्त जागेंत होणारे कार्यक्रम होते -जसे महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव, व दिवाळी तसेच उघड्यावर होणारेही- उदा. होळी, संक्रांत. दरवर्षी एखादी क्रिकेट मॅचही आयोजित केली जाई. बहुतांश सभासद शिपींग व बँकिंग्मधे काम करणारे होते, व बहुतांश सभासद हाँगकाँग बेटावर रहात. तेव्हा हे सर्वच कार्यक्रम त्या बेटावरील स्थळांवर होणे सोयीचे ठरे. सुमारे २००५ -८ पर्यंत हाँगकाँग बेटाव्यतिरीक्त लोकसंख्या गौलून येथे होती-- 'तिन शुई वान', 'तुंग चुंग', 'च्युंग ग्वान ओ' हे प्रदेश अगदी अलिकडे विकसित झाले, अनेकानेक मराठी कुटुंबे आता तेथे रहात आहेत, व साहजिकच कार्यक्रमाची स्थळेही गेल्या काही वर्षांत उत्तरेकडे सरकली आहेत.

 

अतिशय कमी सभासद- संख्या असतानांही मात्र जे कार्यक्रम केले जात, ते मात्र बरीच मेहनत घेऊनच! बहुतांश कार्यक्रम गाण्याचे असत; क्वचित एखादे नाटक बसवले जाई. पण जे जे केले जाई, ते शक्यतोंवर रेखिव असावे ह्याकडे कटाक्ष ठेवला जाई. गेल्या काही वर्षांत ह्याला, एखादा विषय घेऊन त्यावरच सर्व कार्यक्रम करण्याचे अजून एक नवे परिमाण मिळाले आहे.

 

गेल्या सुमारे १०- १२ वर्षांत, येथे नोकरी- व्यवसायानिमीत्त येणार्‍या मराठी जनांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली. इतकेच नव्हे, तर सभासदांचे सरासरी वय कमी झाले. तेव्हा आता कार्यक्रमाच्या कक्षाही बर्‍याच रूंदावलेल्या दिसतात. एकांकिका होतातच, तसेच आता नृत्याचे कार्यक्रम विशेष उत्साहाने केले जातात व तरूणाई त्यांत अतिशय उत्साहाने भाग घेतांना दिसते.

 

२००३ साली मंडळाची अधिकृत नोंदणी होण्यापूर्वी, व त्याची  तत्कालिन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, गणेशोत्सव वगळता, इतर कार्यक्रमांना जागा मिळवण्यासाठी इंटरनॅशनल शाळांकडे, मंडळातील कुण्या सभासदांतर्फे गळ घातली जाई. शाळा त्यांचे हॉल्स विनामूल्य देत. गेल्या १०- १२ वर्षांत मात्र हे चित्र आश्चर्यकारकरीत्या बदलले आहे. सभासद संख्या वाढलीच तसेच कार्यक्रमांच्या आयोजनांसाठी मंडळ, स्पॉन्सरशिप घेऊ लागले. परिणामी आता बरेच कार्यक्रम, विशेषतः दिवाळीचा कार्यक्रम हॉटेल्समधील हॉल्स घेऊन साजरे होतात.

 

पूर्वी कार्यक्रमाच्या नियोजनात, सभासदांना माहिती देण्याचे काम, पत्रके काढून करावे लागे. ही पत्रके पोस्टाने रवाना केली जात. व नंतर कार्यकारिणीच्या अधिकार्‍यांना घरोघरी फोन करून, किती माणसे येणार आहेत ह्याची माहिती, कार्यक्रमाच्या बरीच अगोदर करून घ्यावी जागे. कालांतराने ई-मेल्सची सोय झाली, व हे काम बरेच सुकर झाले. प्रत्येक कार्यक्रमाची वर्गणी तसेच वार्षिक वर्गणी, रोखीने घ्यावी लागे. आता आपण ई- पेमेंट्चा वापर करू शकतो.

 

तंत्रज्ञानाचा वापर आपण सध्याच्या कोव्हिडच्या काळांत सहजपणे करून घेऊन दूरस्थ कलाकारांनी आपल्यासाठी सादर केलेले कार्यक्रम अनुभवू शकतो आहोत. तसेच कुठल्याही कार्यक्रमासाठी मूळ गीते व नृत्ये, आता सहजपणे इंटरनेट्वर उपलब्ध असतात. ती वारंवार, हवी तशी, हवी तितक्यांदा बघण्याची सोय आता आहे. गीत कॅसेटवर कुणाकडे उपलब्ध असेल तरच ते कार्यक्रमात घेता येईल' अशा थोड्याश्या कठीण परिस्थितीपासून आता आपण बरेच दूर आलेलो आहोत. एकत्र येउन कार्यक्रम करण्याचा उत्साह मात्र तेव्हा तितकाच होता, आताही तितकाच आहे. 

 

- श्री प्रदीप लाड

सुमारे ३० वर्षें हॉंगकॉंग मधील प्रदीर्घ वास्तव्य