विहंग नगरी- ताई पो काउ

ताई पो काउची पहिली भेट झाली, २०२१ च्या जानेवारी महिन्यात, पक्षी निरक्षणाच्या निमित्ताने! आणि नंतर पक्षी- ताई पो काउ - आणि मी ही गट्टी हॉंगकॉंगच्या वास्तव्यात चांगलीच टिकली, विशेषतः पक्ष्यांच्या हंगामापुरती तरी! ताई पो काउ मध्ये आणखी विशेष म्हणजे जेस्सी नावाचा एक हॉन्गकॉन्गर मित्र येथे भेटला.  पक्षी निरीक्षणाचं अगदीच नवीन वेड लागलं होतं. पहाटे उठायचं आणि पहिली मेट्रो पकडून कुठेतरी जायचं. सोबत कॅमेरा आणि खाण्यासाठी थोडंफार घेतलं कि दुपारपर्यंतचा वेळ या पक्ष्यांमध्ये चांगलाच रमायचा. जानेवारी महिन्यात हॉंगकॉंग मध्ये बरेच स्थलांतरित पक्षी येतात. त्यांच्या ठिकाणांची यादी बनवली होती त्यात ताई पो काउ  अग्रस्थानी होते. सकाळी सव्वा सहाची मेट्रो पकडून मी कावलून टॉंगला उतरलो. तिथून पुन्हा दुसरी मेट्रो पकडून फो तान आणि तिथून पुढे मिनी बस ! बस अगदी थांबते ते ताई पो काउ  नेचर रिजर्वच्या समोर! फो तान  पासून ताई पो काउचा रस्ता एका बाजूला हिरवागार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खाडी असा अगदी वळणावळणाचा आहे. ताई पो काउ जवळ येताच लहान लहान गावं दिसतात. येथील बरेच लोक मासेमारी करतात म्हणून या भागाला फिशरमेन व्हिलेज असेही म्हणतात. 

 

      ताई पो काउचा मुख्य रस्ता सोडून आपण ताई पो काउच्या फॉरेस्ट रोड वर येतो. तिथे वाहनांचा एक चेक पोस्ट आहे आणि चढ पार केल्यावर लगेच एक नकाशा दिसतो. तिथून दोन रस्ते सुरु होतात. वास्तविक तो संपूर्ण एक वर्तुळाकार रस्ता आहे. तिथून सुरु होतो ताई पो काउचा नेचर ट्रेल ! संपूर्ण ट्रेल वर अनेक प्रकारची झाडं दिसतात. वास्तविक वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणारी कित्येक मंडळी इथे बसलेली , फिरताना दिसतात. यात एकूण चार भाग आहेत. रेड वॉल्क , ब्लू वॉल्क , ब्राउन वॉल्क आणि येलो वॉल्क . रेड वॉल्क  आणि ब्लू वॉल्क तीन ते चार किमी चे आहेत. कमी चढाचा रस्ता आणि साधारण दीड दोन तासात पूर्ण करण्यासारखा असल्याने सुट्टीच्या दिवशी लहान मुले तसेच वृद्ध मंडळी या भागात दिसतात. 

 

    येलो वॉल्क  चा रस्ता तसाच पुढे जातो. साधारण दहा किमी चा वर्तुळ पूर्ण करतो. पुढच्या रस्त्यावर जरा कमी गर्दी असते. बऱ्याचदा पुढे सगळे पक्षी निरीक्षण करणारे असतात. हातात मोठ्या लेन्स , कॅमेरा , दुर्बीण असा लवाजमा असलेली चायनीज , जपानी मंडळी पुढे दिसतात. पुढे एक छोटासा ओढा वाहतो. तिथे मला अनेक जण झुडूपाजवळ गोळा झालेली दिसली. अगदी मूर्तीसारखी बसलेली, कॅमेरे डोळ्याला लावून. मग लक्ष गेले समोर एका फुलझाडावर सूर्यपक्ष्याचे नर आणि मादी होते. त्यांना कोणताही अडथळा न करता, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला किंचितही धक्का न लावता लोक निरीक्षण करीत होते. ते नक्कीच कौतुकास्पद होतं . मी सुद्धा तिथे बराच वेळ थांबलो. त्या अतिशय चपळ जांभळ्या चमकत्या नर सूर्यपक्ष्याची आपल्या वक्र चोचीने फुलातील मकरंद ओढण्याची धडपड आणि पानांसारखा हिरवा रंग असलेली मादी मध्येच अदृश्य कि काय असं वाटत होतं . इथेच येताना माझी जेस्सी बरोबर ओळख झाली. मी या पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी मध्ये नवशिका असल्याने आणि त्याचे पक्षी ओळखण्याचे कसब पाहून काहीतरी शिकायला मिळेल या उद्देशाने मी त्याला "मे आय जॉईन यू ?" विचारले आणि त्यानेही लगेच “हो” म्हटले. नंतर आम्ही जवळपास दर शनिवारी पक्षी निरीक्षणासाठी जात असू. त्यात ताई पो काउ आणि लॉन्ग व्हॅली ही खास ठिकाणे होत.

 

ताई पो काउमध्ये तांबटच्या प्रजातीतील पक्षी, तीन प्रकारचे बुलबुल , पिवळा बलगूली (टिट), नटहॅट्च, फ्लायकॅचर, खाटीक, बी इटर, सूर्यपक्षी , लीफ बर्ड  , तसेच सैबेरिअन स्टोन चाट सारखे स्थलांतरित असे अनेक पक्षी हंगामात पाहायला मिळतात. पक्षी निरीक्षणासाठी हा स्वर्गच असतो. शिवाय येथील लोकांचा एक अलिखित नियम आवडला, तो म्हणजे ते पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धक्का लावत नाहीत. 

 

    समुद्रसपाटीपासून साधारण ५० मी ते अगदी उंच भाग ६५० मी ग्रासी हिल पर्यंत ४६० हेक्टर मध्ये संपूर्ण हिरवीगार झाड आहेत. ग्रासी हिल पासून खाली ताई पो काउ  रोड पर्यंत १०० विविध प्रकारची झाडं आहेत. गेल्या शतकाच्या मध्यापर्यंत हॉंगकॉंग मधील बरीच जंगलं तोडली होती. जपानी सैन्याने आक्रमण केलेल्या काळात देखील बरीच झाडे तोडली गेली. नंतरच्या काळात धरणं बांधून त्याच्या यावरील भागात संरक्षित वनीकरण सुरु केले गेले. त्यावेळी ताई पो काउ मध्ये अनेक स्थानिक झाडांना प्राधान्य दिलं गेलं . हा नैसर्गिक अधिवास ताई पो काउचं आता वैभव आहे.  जगातील सगळ्यात मोठ्या पतंगांपैकी (moth) ऍटलास मॉथ या भागात आढळतो. तसेच भीमपंखी फुलपाखरे, ब्लू बॉटल अथवा शनी पाकोळी, कॉमन मोर्मोन, कॉमन मॅपविंग, डफर , मयूर भिरभिरी अशी कित्येक फुलपाखरे येथे हंगामात पाहायला मिळतात. लहान सरडे आणि विविध पाली देखील आहेत. काही गायी दिसल्या, परंतु त्या जंगलातील होत्या कि पाळीव हे माहित नाही. 

 

    काही भागात कॅम्प करून राहण्यासारखी जागा दिसते परंतू वाढत्या वणव्याच्या प्रकरणामुळे असे बार्बीक्यू आता बंद आहेत. बरेचसे विषारी साप या भागात असल्याची माहिती मिळाली. त्यात कोब्रा, घाणोस इत्यादी आहेत. माणसांच्या वर्दळीमुळे ते फार वाटेवर येत नसावेत. संपूर्ण वाटेवर माहिती फलक आणि दिशादर्शक आहेत. तिथे आढळणाऱ्या पक्षी, प्राणी-किटकांची माहिती असलेले फलक आहेत. शिवाय शौचालय सुविधा देखील आहे. 

 

डोंगराच्या मागच्या बाजूला भलेमोठे स्मशान आहे. त्या भागात काही भटकी कुत्री दिसली. बराच काळ कोणी गेलं नसल्याने खूप पाचोळा , कोळ्याची बरीच मोठी जाळी दिसली. एक दोन जुनी पडकी घरे किंवा वनविभागाची जागा देखील मागील भागात दिसली. 

 

    ताई पो काउ ला खरंतर विहंग नगरी म्हटलं पाहिजे. मला हॉंगकॉंग मधील सर्वात जास्त आवडलेले ठिकाण म्हणजे हीच विहंग नगरी !

 

तेजस ©️ 

 

२१-१२-२०२१