अल्ट्रा कहाणी- दसऱ्याचे सीमोल्लंघन

2012 च्या मुंबई मॅरथॉनच्या मुहूर्तावर (TCS) कंपनीच्या फिटनेस उपक्रमाची धुरा माझ्यावरती सोपवली गेली आणि तिथून माझ्या धावण्याची आणि एकंदरीत आरोग्यवर्धनाची गाडी सुरू झाली. पवईच्या उद्यानात ६०० मिटरचा जीवघेणा राऊंड पासून सुरवात केली, ते मागील वर्षा अखेरीला १०३ किलोमीटरची अल्ट्रा मॅरथॉन पर्यंत पोचलो. हे मोठेच संक्रमण, पण त्या बाबत नंतर कधीतरी सविस्तर लिहेन. 

 

अल्ट्रा मॅरथॉन म्हणजे ४२ किलोमीटर वरील कुठलेही अंतर. हौशी किंवा व्यावसायिक अल्ट्रा मॅरथॉन ५० किलोमीटर पासून सुरवात होतात (टाटा अल्ट्रा) आणि मनुष्याचा  जिद्दीचा अक्षरश: कस पाहतात ३३३ – Le Ultra ते ३००० किलोमीटर च्या वर). Badwater अल्ट्रा (अमेरिका), Ultra Trail du Mont Blanc (स्वित्झर्लंड), Spartathalon (ग्रीस) आणि Comrades अल्ट्रा (दक्षिण आफ्रिका) ह्या काही प्रसिद्ध शर्यती.

वयाच्या ४४ व्या वर्षापर्यंत फक्त बेस्ट बस किंवा बोरिवली फास्ट लोकल पकडण्यासाठी धावायचो. २०१२ नंतर हळू हळू सुरुवात झाली. एका वर्षानंतर कंपनीने त्या उपक्रमात पोषक आहाराचा समावेश केला आणि माझ्या प्रगतीत कायापालट झाला - कायेतही झाला !

भारतात असताना मी मॅरथॉन पेक्षा अल्ट्रा मॅरथॉन जास्त धावलो. ४ वर्षापूर्वी हाँगकॉंगला येण्याची संधी ही माझ्यासाठी पर्वणीच होती. आपणास कदाचित माहीत नसेल तेव्हा सांगतो की हाँगकॉंग शहर अल्ट्रा मॅरथॉन साठी मॅरथॉन षौकिनांच्या कळपात प्रसिद्ध आहे. इथल्या trails अल्ट्रा मॅरथॉनच्या चाहत्यांना आणि सर्वांनाच भुरळ पाडतात. मी इथे मनसोप्त धावतो.

या वर्षाच्या सुरुवातीला एका अल्ट्रा मॅरथॉन धावपटू मित्राने एक चांगला उपक्रम सांगितला. २०२१ सालात २० हाफ मॅरथॉन (२१ किमी) धावायचा प्रस्ताव त्याने मांडला. मार्च पर्यन्त मी जास्त काही विचार केला नाही आणि कधीतरी त्या महिन्यात सुरुवात केली.

मुग्धाने सीमोल्लंघनावर काही लिहाल का असे विचारले तेव्हा ठरवले की या वर्षातली माझी १६वी हाफ मॅरथॉन हॉंगकॉंगच्या सीमेपर्यंत तरी करूया (कोविडकृपेने सीमेपार तर जाता येत नाही).

Tai Koo ते Tin Shui Wai हा प्रवास MTR ने केला. तो प्रवासच एका परीने अल्ट्रा प्रवास आहे. हॉंगकॉंगचे सीमा-दर्शन सुद्धा होते. गाडी Kam sheung रोड स्टेशन सोडते तेव्हा पैलतीरावरच्या Shenzhen शहराच्या गगनचुंबी इमारती आपल्याला दिसू लागतात. आजचे वातावरण ढगाळ होते. दरम्यान, कालच्या T8 वादळाचे गांभिर्य T3 पर्यंत कमी केले वेधशाळेने. पावसाची रिपरिप सुरूच होती. गाडीला गर्दी पण नव्हती. सकाळी साडे आठच्या सुमारास Tin Shui Wai  स्टेशनच्या बाहेर आलो. हा भाग हाँगकाँगच्या “New Territories”चा भाग आहे. प्रसिद्ध वेटलँड पार्कला इथून जाता येते. इथून उत्तरेला सीमेपर्यंत जिथपर्यंत जाता येईल तितके (पळत ) जायचा मानस होता. आणि नंतर पश्चिमेकडे वळून Tuen Mun पर्यन्त जायचे – असे साधारण २३ किमी.

४ किमी नंतर “Lau Fau Shan” नामक एक कोळ्यांची लहानशी वस्ती आहे. गावाच्या सुरवातीला चिनी पारंपारिक कमान आहे. एका छोट्या गल्लीमधून वाट काढत समुद्रकिनारी (खाडीच्या किनारी) पोहोचलो. छोट्या बोटी आणि हॉंगकॉंग चिनी वंशाचे कोळी आपापल्या कामात व्यग्र होते. समोर होते Shenzhen Bay आणि त्या पलिकडे दिसत होत्या Shenzhen शहराच्या टोलेगंज इमारती. त्या भागात काही स्थलांतरित भारतीय लोक सुद्धा आढळले, जे या मासेमारीच्या व्यवसायात मजुरीचे काम करत होते.

 

सकाळी लवकर निघालो होतो तेव्हा जरा न्याहरी करायचा विचार केला. एक छोटे उपहारगृह दिसले. आत ७ / ८  बाकांवरती काही स्थानिक लोक त्यांच्या गप्पात आणि खाण्यात मग्न होते. मी गेल्या एका वर्षांपासून Vegan व्हायचा प्रयत्न करतोय. तेव्हा अशा आडगावच्या हॉटेलात Vegan पदार्थ मिळणे अवघड होते. त्यात त्या ऑर्डर घेणाऱ्या चुणचुणीत ठेंगण्या मुलीला इंग्रजी येत नव्हते. तिचे वडील मदतीला आले  आणि त्यांच्या कामचलाऊ इंग्रजीत माझ्या ब्रेड टोस्ट आणि चिनी चहापानाची सोय झाली.

बाहेर येवून पश्चिमेकडे धावू लागलो. गुगलनुसार डीप वॉटर रोड काही किमी पर्यन्त घेवून नंतर तो रस्ता Castle Peak टेकड्यातून Tuen Mun कडे जात होता. दुसरा रस्ता जो गुगलने सुचवला नव्हता तो समुद्राच्या कडे कडेने जात Tuen Mun पर्यन्त जात होता. मी दुसरा पर्याय निवडला. रस्त्यावरती वादळामुळे खूप झाडे पडली होती, ठीकठिकाणी पाणी साठले होते. एका बाजूला Shenzhen Bay आणि दुसऱ्या बाजूला Castle Peak च्या टेकड्या. संपूर्ण मार्गात स्ट्रॉबेरी आणि Lycheeचे लहान मळे, पाणी साठवून केलेली कृत्रिम छोटी तळी ज्यामध्ये तुम्ही गळ टाकून मासे पकडू शकता आणि नंतर ते भाजून Barbecue करूनही खाऊ शकता पण पैसे देऊन !

८ किलोमीटर नंतर एक चुकीचे वळण घेतले आणि एका अत्यंत छोट्या गावात जिथे रस्ता संपला तिथे थडकलो आणि एक चिंचोळी पाऊलवाट दिसली. मालकाचे कुत्रे सुद्धा भुंकायला लागले. गुगलचे ऐकायला हवे होते. परत फिरावे लागले आणि ठरवले की Tuen Mun ला पुन्हा केव्हा तरी. परत त्याच वाटेने मागे फिरलो. ४ किलोमीटर चा हा एक detour घेऊन Tin Shui Wai ला परत पोचलो. २३ किलोमीटर चा हा सोळावा अध्याय असा संपला ! 

 

तीन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. १) हाँग काँग फार सुंदर आहे, छान निसर्ग लाभलाय या गजबजलेल्या शहराला. शक्य असेल तितके पहा. २)अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित आहे या निसर्गात फिरणे ३) इथल्या प्रशासनाने सगळीकडे टॉयलेट, पाणी, दोन भाषेतील फलक, आणि शक्य होईल तिथवर प्रवासाची सोय केलेली आहे – तेव्हा यावा हाँगकाँग आपलेच असा. (कोंकण आपलेच असा - आठवतय ?)

 

- मिलिंद कांबळे  

   Delivery & Operations Head Asia Pacific, TCS